“स्वच्छ’कडून अवास्तव शुल्क वसुली

संस्थेकडून कराराचा गैरफायदा : तातडीने रद्द करण्याची विरोधीपक्ष नेत्यांची मागणी

पुणे – शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या स्वच्छ संस्थेकडून कराराचा गैरफायदा घेत व्यावसायिक संस्थाकडून अवास्तव शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे या संस्थेचा करार तातडीने रद्द करावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी तुपे यांनी हडपसर येथील एका शैक्षणिक संस्थेस कचरा उचलण्यासाठी ‘स्वच्छ’ने तीन हजार रुपयांची मागणी केल्याचे कोटेशनच सादर केले. दरम्यान, स्वच्छकडून कोणत्याही कराराचा भंग झाला नसल्याचा दावा स्वच्छ संस्थेच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.

-Ads-

तुपे म्हणाले की, महापालिकेने स्वच्छ संस्थेशी नुकताच 5 वर्षांचा करार केला आहे. त्यानुसार, स्वच्छकडून ज्या प्रभागात हा कचरा संकलित केला जाईल. त्या प्रभागात निवासी मिळकत असल्यास प्रतीमाह 60 रुपये आणि व्यावसायिक मिळकत असल्यास महिन्याला 120 रुपये घेणे अपेक्षीत आहे. मात्र, स्वच्छकडून हडपसरमधील मेंटॉर इंटरनॅशनल स्कूलला रितसर कोटेशन पाठवून प्रत्येक महिन्यास कचरा उचलण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली असून त्यावर 18 टक्के जीएसटीही लावला आहे. तसेच करार झाल्यानंतर हे शुल्क वेळेत न दिल्यास त्यावर दरमहा 2 टक्के दंड आकारला जाईल, अशी अटही घातली आहे. त्यामुळे स्वच्छ सरळ सरळ नागरिकांची लुट करत असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. तसेच स्वच्छकडून अशा प्रकारे पैसे मागणे हा सरळ सरळ महापालिकेच्या कराराचा भंग असून त्यांचे काम तातडीने बंद करावे तसेच शहरातील ज्या काही इतर संस्था हे काम करण्यास तयार असतील त्यांना हे काम द्यावे, अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

शुल्काची मागणी करारानुसारच : स्वच्छ
तुपे यांनी केलेले आरोप स्वच्छ संस्थेने फेटाळून लावले आहेत. महापालिकेशी स्वच्छ संस्थेच्या झालेल्या करारात, त्या ठिकाणी “बल्क वेट’ नियोजित वजनापेक्षा जादा कचरा असेल अशा ठिकाणी किती शुल्क आकारायचे याचा अधिकार स्वच्छला असेल अशी तरतूद असल्याचे स्वच्छचे प्रतिनिधी हर्षद बर्डे यांनी सांगितले. ही शाळा एक संस्था आहे, त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याचे प्रमाण हे जास्त असल्याने कचरा वेचक स्वत:चा टेम्पो वापरून हा कचरा उचलणार आहे, या बाबींचा विचार करून हे शुल्क निश्‍चित करून त्यानुसार, कोटेशन पाठविल्याचा दावा बर्डे यांनी केला आहे. तसेच संस्थेकडून कोणताही नियमभंग झालेला नसल्याचेही ते म्हणाले.

स्वच्छ संस्थेकडून जादा पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार, माहिती घेतली जात आहे. अशा प्रकारे शुल्क आकारण्याचा अधिकार स्वच्छला नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

– सुरेश जगताप, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)