डुक्‍कर पकडण्यासाठी “आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’

तब्बल 73 लाख रुपयांची तरतूद : मागील वर्षी घाट्याचा सौदा

पुणे – कुत्र्यांबरोबरच डुकरांचा काही भागात सुळसुळाट प्रचंड वाढला असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने तब्बल 73 लाख 60 हजार रुपये खर्च करण्याला मंगळवारी स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली.

-Ads-

मागीलवर्षी 48 लाख रुपये तरतूद करण्यात आली होती. तरीही परिस्थिती जैसे थे असून, एवढे लाख रुपये खर्चूनही पकडलेल्या डुकरांच्या लिलावापोटी 7 लाख 75 हजारच रुपये महापालिकेला मिळाले आहेत. “मयूर पिगारी फार्म’ या कंपनीला तीन वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.

मोकाट डुकरांच्या त्रासाबाबत महापालिका मुख्यसभेतही अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत. या मोकाट डुकरांना पकडण्याचे काम याच “मयूर पिगारी फार्म’ला देण्यात आले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणात न येता जैसे थेच राहिली. या कंपनीला दहा किलो वजनावरील डुक्कर 993 रुपये प्रतिनग आणि दहा किलोखालच्या डुक्कराला 500 रुपये प्रतिनग या प्रमाणे देण्याला तसेच लिलावासाठी अनुक्रमे 150 रुपये आणि 100 रुपये प्रतिनग निश्‍चित करण्यात आले होते.
या कालावधीत या कंपनीने दहा किलोवरील वजनाची 5,178 आणि दहा किलोखालील वजनाची 130 अशा 5,308 डुकरांची कत्तलखान्यात विल्हेवाट लावण्यात आली होती. महापालिकेला लिलावापोटी 7 लाख 75 हजार रुपये मिळाले.

या आर्थिक वर्षात दहा किलोपेक्षा अधिक वजनाच्या डुकरासाठी 979 प्रतिनग आणि दहा किलोपेक्षा कमी वजनाच्या डुकरासाठी 500 रुपये प्रतिनग असा दर प्रशासनाने निश्‍चित केला होता. या कामाचा कालावधी तीन वर्षांचा ठरविण्यात आला होता. याच फार्मने दिलेल्या यावर्षीच्या निविदेत दहा किलोवरील डुकरासाठी 1,148 रुपये प्रतिनग आणि 10 किलोपेक्षा कमी वजनाच्या डुकरासाठी 500 रुपये प्रतिनग दर ठरविण्यात आला आहे. यामध्ये सेवकवर्ग, वाहन, इंधन, वाहतूक खर्चासह डुकरे उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)