महापालिकेत शुकशुकाट; नागरिक आलेच नाहीत

कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचीही अडचण

पुणे – महाराष्ट्र बंदचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावरही झाला. महापालिकेत कामकाजासाठी नागरिक आलेच नाहीत. त्यामुळे महापालिकेत दिवसभर शुकशुकाट होता.

महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे अन्य आस्थापनाही बंद असतील, असा सर्वसामान्य समज झाल्याने तसेच शहरातील वातावरण पाहून कार्यालयीन कामकाजासाठी जाणे अनेकांनी टाळले. तसेच काही खासगी आस्थापनांना सुटीच जाहीर केल्यामुळे त्यांचे प्रतिनिधीही महापालिकेत आले नाहीत. यामुळेच कायम गजबजलेल्या महापालिकेतही कामकाजासाठी फारसे कोणी फिरकले नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वगळता महापालिकेत कोणीही नव्हते.

महापालिकेतील अनेक कर्मचारी बसने येतात. परंतु कामकाजाची वेळ संपल्यानंतर घरी जाताना कर्मचाऱ्यांची वाहनव्यवस्था न झाल्याने त्यांना घरी पोहोचणे अवघड झाले. काही कर्मचारी लांब राहत असल्याने त्यांना घरी जाण्याची सोय झाली नाही. बंद म्हटला, की दगडफेक होऊन कायमच बसवरच संक्रांत येत असल्याने यावेळी बससेवाही बहुतांशी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना या थांब्यावरून बसच मिळाली नसल्याने त्यांचे हाल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)