पुणे – आणखी 125 ई-बस येणार मार्गावर

येत्या महिनाभरामध्ये सेवेत : 12 मीटर लांबीच्या असणार

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये पहिल्या टप्प्यात दाखल होणाऱ्या उर्वरित ई-बसेस येत्या महिनाभरामध्ये धावणार आहेत. 12 मीटर लांबीच्या ई-बसेस बीआरटी मार्गावर धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात दोन टप्प्यांत 500 इलेक्‍ट्रिक बस घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 150 बसेसपैकी 25 बसेस फेब्रुवारी महिन्यात दाखल झाल्या आहेत. मात्र, बीआरटी मार्गावर धावणाऱ्या 125 बसेस अद्यापही दाखल झाल्या नाहीत. याबाबत प्रवाशांकडून विचारणा केली जात होती. अखेरीस, या बसेस महिनाभरामध्ये दाखल होऊन बीआरटी मार्गावर धावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पीएमपीएमएल प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मार्गनिश्‍चिती केली असल्याचे नमूद केले.

फेब्रुवारीमध्ये दाखल झालेल्या 25 बसेस 9 मीटर लांबीच्या होत्या; तर नव्याने दाखल होणाऱ्या 125 बसेस 12 मीटर लांबीच्या असतील. या बसेसना दोन्ही बाजूंनी दरवाजे असून बीआरटी मार्गात धावण्यास मदत होणार आहे. याशिवाय ई-बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि सूचना दर्शविणारे डिजिटल बोर्डही असणार आहेत.

सीएनजी बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
अनेक महिन्यांपासून रखडलेली सीएनजी बसेसची खरेदी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पीएमपीएमएलकडून 12 मीटर लांबीच्या चारशे सीएनजी बसेस खरेदी करण्यात येणार होत्या. या बसेससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पीएमपीएमएलकडे आयुर्मान संपलेल्या सुमारे 200 पेक्षा जास्त बसेस आहेत. प्रशासनाने साधारण दोन महिन्यांपूर्वी 400 बसेसच्या खरेदीला मान्यता दिली होती. या बसेस पुढील दोन महिन्यांमध्ये धावणार असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)