पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना दिला जाणारा पीएमपीचा कागदी मासिक पास आता मी-कार्ड (स्मार्ट कार्ड) स्वरुपात येणार आहे. याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड येथील सर्व पीएमपीच्या पास केंद्रावर याबाबत सूचना देण्यात आल्या असून 1 जून 2019 पासून मासिक पास मी-कार्ड स्वरुपात मिळणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मासिक पास 1 हजार 400 रुपयांमध्ये कागदी स्वरुपात उपलब्ध करून पास देण्यात येत होता. मात्र, आता पीएमपी प्रशासनाकडून यात सुधारणा करण्यात येत असून 1 जून पासून याच मासिक पासला मी-कार्ड स्वरुपात आणण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाकडून सर्वच पास केंद्रावर मी-कार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.
मी-कार्ड काढण्यासाठी नागरिकांना अर्ज भरुन यासाठी 118 रुपये अगाऊ शुल्क, 1 पासपोर्ट आकाराचा फोटो तथा आधार कार्डची छायाकिंत प्रत जोडावी लागणार आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्ष पास केंद्रावर जावून ऑफलाईन पद्धतीने किंवा पीएमपीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येणार आहे. तरी, नागरिकांनी आपले मी कार्ड काढून घ्यावे, असे अवाहन करण्यात आले आहे.