पुणे मेट्रोकडून बॅरिकेड काढण्यास सुरूवात

काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला

पुणे – मेट्रो खांब उभारणी सुरू असताना लावण्यात आलेले दोन ठिकाणचे बॅरिकेड महामेट्रोने काढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. महामेट्रोकडून कर्वे रस्त्यावरील काही भाग तसेच पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मार्गातील काही भागाचा समावेश असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे मेट्रोचा बराचसा उन्नत भाग रस्त्याच्या मध्यभागी पिअर टाकून बाधण्यात येत आहे. अशा पिअरचा पाया पाईल किंवा ओपन फाउंडेशन या पद्धतीने केला जातो. या पाया उभारणीसाठी रस्त्याच्या मध्यभागी साधरणता 9 मीटर जागेची गरज भासते. रस्त्याच्या मध्यभागाच्या दोन्ही बाजूला साडेचार मीटर जागेत बॅरिकेड लावले जातात. त्यामुळे पिअरच्या पायाचे काम सुरक्षितरित्या पूर्ण केले जाऊ शकते. हे काम आव्हानात्मक असते. अशा कामांसाठी रस्त्यातली दुभाजक काढावे लागतात. पादचारी पथाची रुंदी कमी अधिक करावी लागते. या व्यतिरिक्त जमिनीखालून जाणाऱ्या इलेक्‍ट्रिक तारा, पाण्याचे पाइप , गटार लाईन, टेलिफोन लाईनचे स्थलांतर करण्याची गरज असते. हे काम झाल्यानंतर पिअर आर्म व सेगमेंट लॉचिंगची कामे केली जातात. यांनतर रस्त्यातले बॅरिकेड काढण्यात येतात व रस्ता दुरुस्त करुन वाहनांसाठी खुला केला जातो.

पुणे मेट्रोची सेगमेंट लॉचिंग कामे प्रगतिपथावर आहेत. पिंपरी ते स्वारगेट कॉरिडोरमध्ये साधारणत: 740 मीटर लांबीच्या बॅरिकेड काढण्यात आले असून रस्ता पूर्वीसारखा वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच वनाज ते रामवाडी या मार्गिकेत एकूण 750 मीटर मार्गावर बॅरिकेड हलविण्यात आले असून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. पिंपरी ते स्वारगेटच्या मार्गिकेत हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स फॅक्‍टरीसमोरील रस्त्याच्या ठिकाणी व वनाज ते रामवाडी या मार्गिकेत गुजरात सोसायटी ते कृष्णा हॉस्पिटल, आनंदनगर मेट्रो स्टेशन ते आयडीयल कॉलनी बस स्टॉप, आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशन ते एरंडवणा पोलीस चौकी, गरवारे कॉलेज गेट ते सावरकर स्मारक याठिकाणची बॅरिकेड हटविण्यात आली आहेत. यामुळे वाहतूक पूर्वपदावर आल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)