पुणे – मेट्रो हबचा प्लॅन बदलणार?

भुयार सापडल्याने अधिकाऱ्यांनी अभिप्राय मागविला


भुयाराबाबत महापालिका अधिकाऱ्यांनाही नाही माहिती


मेट्रोच्या पत्रावर काय उत्तर देणार? पुणेकरांना उत्सुकता

पुणे – “महामेट्रो’च्या वतीने स्वारगेट येथे विकसित करण्यात येत असलेल्या “मल्टी मोडल हब’च्या जागेमध्ये आढळून आलेल्या भुयारामुळे मूळ आरेखनामध्ये (प्लॅन) बदल करावा लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या भुयारांचे नेमके करायचे काय असा प्रश्‍न, मेट्रोच्या अधिकाऱ्यांपुढे पडला आहे. स्थानकाच्या कामामध्ये या भुयाराचा अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्वारगेट येथील अधिकाऱ्यांनी महामेट्रोकडून अभिप्राय मागविला आहे.

स्वारगेट येथे मल्टिमॉडेल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षि शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला केल्यानंतर खड्ड्यात उतरून पाहिले असता, तेथे भुयार असल्याचे दिसून आले.

“महामेट्रो’ने यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. भुयारातील दगडी भिंतींचे बांधकाम नेमके कधी केले आहे, कशाप्रकारचे आहे, याची माहिती महापालिकेच्या भवन विभागाकडून मागण्यात आली आहे. तब्बल 55 मीटर लांब आणि दीड मीटर रुंद असलेले एक भुयार आहे. त्याला दक्षिण बाजूला अलिकडच्या काळातील पाइपच्या प्रकाराची जोड आहे. काहीजण हे ऐतिहासिक भुयार असल्याचे मत मांडत आहेत. तर काही जण स्वारगेट येथील जलतरण तलावासाठी या भुयाराद्वारे शेजारील कालव्यामधून पाणी आणण्यात आल्याचे सांगत आहेत.

महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रोच्या पत्राला महापालिका काय उत्तर देणार? याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भुयारांची पाहणी करणे आवश्‍यक असतानाही दोन्ही विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकलेच नसल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.

असे आहे भुयार
जमिनीपासून सुमारे 15 फूट खोल हे भुयार आहे. याचे बांधकाम दगडी असून ते अतिशय पक्के आहे. 6 फुट उंच असे हे भुयार असून, यातून एखादी व्यक्ती सहज चालत जाऊ शकते. मात्र, हे भुयार सध्या गाळाने भरले आहे. हे भुयार इंग्रजी “टी’ आकाराचे आहे. हे तीन दिशांना वळवण्यात आले आहे. त्यातील एक बाजू पर्वतीकडे, दुसरी सातारा रस्त्यावर वळवण्यात आले आहे. “टोटल स्टेशन’ मशीनच्या सहाय्याने हे भुयार स्कॅन केले आहे, त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

ऐतिहासिक बांधकाम असेल असे वाटत नाही. हे भुयार इंग्रजी “टी’ आकारातील आहे आणि ते दुसऱ्या बाजूला बंद आहे. तसेच तेथे स्टीलचा पाईप आढळला आहे. या सगळ्या बाबींवरून हे भुयार पुरातन काळातील असावे असे वाटत नाही. येथील जलतरणतलावाला कालव्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी ते बांधले असावे असे वाटते. तरीही याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला पत्र दिले आहे. पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी अद्याप पाहणी केली नाही.
– डॉ. हेमंत सोनावणे, सरव्यवस्थापक, महामेट्रो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)