पुणे मेट्रोसाठी नागरिकांच्या खिशात ‘हात’

मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्‍के वाढ : घरे आणखी महाग होणार

पुणे – मेट्रो प्रकल्पासाठी नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. मेट्रो प्रकल्पास निधी उभारण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्‍का अतिरिक्त शुल्क वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरुवात केली आहे. याचा परिणाम घरांच्या किमतींवर होणार असून घरे आणखी महाग होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागपूर मेट्रोच्या होणाऱ्या प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चासाठी तरतूद करण्यासाठी राज्य शासनाने एक टक्‍का अतिरिक्त शुल्क आकारण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढली असून त्याची अंमलबजावणी मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याच धर्तीवर पुणे मेट्रोसाठी एक टक्‍का अतिरिक्त शुल्क आकारण्याची मागणी पुणे महानगरपालिकेकडून नोंदणी विभागाकडे करण्यात आली होती. महापालिकेची ही मागणी मान्य करीत शासनाने मुद्रांक शुल्कात एक टक्‍का वाढ केली आहे.

सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये दस्त नोंदणीवर 5 टक्‍के, मुद्रांक शुल्क व 1 टक्‍का सेस भरावा लागत होता. त्याचबरोबर 30 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर आणखी एक टक्‍का म्हणजेच जास्तीत जास्त 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते. तर 30 लाखांवरील व्यवहारावर सहा टक्‍के मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क 30 हजाराच कायम होते. मेट्रो प्रकल्पासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आणखी एक टक्‍का अतिरिक्त मुद्रांक शुल्क आकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही महानगरपालिकेच्या हद्दीत तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर 7 टक्‍के ऐवजी (नोंदणी शुल्क धरून) 8 टक्‍के मुद्रांक शुल्क आकारले जात आहे.

अतिरिक्‍त शुल्कातून वर्षाला 300 कोटी मिळणार
पुणे महानगरपालिका आणि नोंदणी विभागाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झाली होती. या बैठकीत शहरात एक टक्‍का अतिरिक्त शुल्क वाढविल्यास वर्षाकाठी किती रक्‍कम गोळा होईल, याचा अंदाज महापालिकेकडून घेण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सदनिका, जमीन, दुकाने खरेदी-विक्रीचे व्यवहार, दान, गहाणखत, मोबदला किंवा कर्ज रक्‍कम जी जास्त असेल त्या किमतीवर एक टक्‍का कराची रक्‍कम आकारली जाणार आहे. एक टक्‍का अतिरिक्त शुल्कातून शासनाला वर्षाला सुमारे 300 कोटी रुपये मिळणार असल्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)