पुणे – 500 कोटींचा यंदाही चुराडा?

कॉंक्रिटीकरण, बकेट, बाकडे, एलईडी फॉर्मात

पुणे – यापुढे नागरिकांची गरज लक्षात घेऊन विकासकामे करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले असतानाच 2019-20 च्या अंदाजपत्रकातील कामांची तरतूद पाहता तब्बल 500 कोटी रुपयांच्या विकासकामांवर यंदाही उधळपट्टी होणार असल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रस्तावित कामांमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, 100 कोटींची परिसर तसेच चौक सुशोभिकरणाची कामे, 40 कोटींची बाकडे, पिशव्या, बेंच खरेदी, तब्बल 80 कोटींचे एलईडी आणि पथदिवे खरेदी, सुमारे 52 कोटींचे रस्त्यांचे तुकड्या-तुकड्यांचे डांबरीकरण अशा कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शहरात समान पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेली खोदाई, एलईडी दिवे बसविणे, मुख्य खात्याकडून पदपथांची निर्मिती अशी कामे केली जात असताना, क्षेत्रीय कार्यालयांना असलेल्या खर्चाच्या अधिकारात ही कामे बसविण्यात आली आहे.

कॉंक्रिटीकरणाचे पेव
या वर्षात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी रस्ते खोदाईस मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या योजनेसाठी जवळपास 80 टक्के रस्ते खोदले जाणार आहेत. त्यात 9 मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या सुमारे 54 टक्के रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून प्रभागांतील गल्लीबोळांत कॉंक्रिटीकरणाचे पेव फुटले आहे. यंदाही सुमारे 99 कोटी 86 लाख रुपयांची ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. एका बाजूला पाणी नसल्याने खोदाई आणि कॉंक्रिटीकरण करू नयेत, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली असतानाच अंदाजपत्रकात त्यासाठी तब्बल 100 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

80 कोटींचे पथदिवे, 60 कोटींचे सुशोभिकरण
शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी आधी टाटा आणि आता ईएसएल कंपनीकडून हे बल्ब बसविले जाणार आहेत. त्यासाठी स्थायी समितीने नुकतीच 19 कोटींच्या खरेदीस मान्यता दिली आहे. हे काम दिल्यानंतर पुढील दहा वर्षे या कंपन्यांनीच त्याची देखभाल दुरूस्ती तसेच दिवे बदलण्याची जबाबदारीही त्याच कंपनीची आहे. मात्र, अंदाजपत्रकात विद्युत विभागासाठी पथ दिव्यांचे खांब खरेदीसाठी 14 कोटी, तर नगरसेवकांच्या “स’ यादीत एलईडी दिवे खरेदी तसेच खांब खरेदीसाठी तब्बल 60 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतून कोणते एलईडी बसविणार, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

50 कोटींचे पदपथ
प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट स्ट्रीट अंतर्गत पथ विभागाकडून नव्याने पथपथ विकसित करण्यात येत आहेत. असे असतानाच पुन्हा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून तब्बल 42 कोटी खर्चून पदपथ विकसित केले जाणार आहेत. वास्तविक, फूटपाथ तयार करताना रस्त्यांची रुंदी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. मात्र, निधी खर्ची पाडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी चक्क 6 मीटरच्या आतील रस्त्यांवरील एक ते दोन फुटांचे पदपथ उभारण्याचा पराक्रम केला आहे.

40 कोटींच्या बकेट, पिशव्या, बेंच
दरवर्षी वाटल्या जाणाऱ्या कापडी पिशव्या, बकेट आणि बेंच वरून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागत असतानाच या वस्तू खरेदीसाठी यंदा या वस्तूंसह कापडी पिशव्या, सॅनेटरी नॅपकीन खरेदी आणि दिशादर्शक फलकाच्या नावाखाली जवळपास 40 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)