सरकारी कार्यालयांत स्थलांतरणास नकार
पुणे – सरकारी कार्यालयांत स्थलांतररित होण्यास नकार देणारी 18 आधार केंद्र जिल्हा प्रशासनाने निलंबित केली आहेत. या केंद्रांच्या चालकांना नोटिसा देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
आधार नोंदणी किंवा आधार दुरुस्ती करण्यासाठी खासगी जागेतील आधार केंद्रचालकांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आधार केंद्रे ही सरकारी जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत 87 आधार केंद्र स्थलांतरीत झाले आहेत. केंद्र चालकांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. संबंधितांनी नोटिसांनाही प्रतिसाद न दिल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निलंबित करण्यात आलेल्या केंद्रचालकांकडे माहिती तंत्रज्ञान विभागाची आधार यंत्रे आहेत. त्यांना ही आधार यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी यंत्रे जमा न केल्यास सरकारी मालमत्ता अनधिकृतपणे जवळ बाळगल्याप्रकरणी संबंधित केंद्रचालकांविरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि जिल्ह्याच्या परिसरात आधार केंद्र सुरू आहेत. ही आधार केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहेत.