पुणे – एलईडी फिटिंग्जचा प्रस्ताव स्थायीत

फिलिप्स कंपनीला डोळ्यासमोर ठेवूनच निविदा काढल्याची चर्चा

पुणे – शहरातील पथदिव्यांवर 52 हजार फिलिप्स कंपनीच्या एलईडी फिटिंग्ज बसविण्यासाठी शासनाने सुचविलेल्या मे. ईईएसएल या कंपनीसोबत करार करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. यासाठी 19 कोटी 16 लाख 68 हजार रुपये खर्चासही मान्यता मागण्यात आली आहे. दरम्यान, यापेक्षा कमी खर्चात चांगल्या कंपन्यांच्या एलईडी फिटिंग्ज बाजारात उपलब्ध असून केवळ फिलिप्स कंपनीलाच हे काम मिळावे यासाठी निविदेतील अटीशर्ती निश्‍चित केल्याची टीका होऊ लागल्याने ही निविदाही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजेची आणि पैशांची बचत आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरातील पथदिव्यांवरील हायमास्टचे दिवे बदलून एलईडी फिटिंग्ज बसविण्याला मान्यता दिली होती. हे काम टाटा कंपनीला देण्यात आले होते. यामुळे होणाऱ्या वीजबचतीचा 98.5 टक्‍के हिस्सा संबंधित कंपनीला तर उर्वरीत हिस्सा महापालिकेला राहातील असा करार करण्यात आला होता. शहरात सुमारे 1 लाख 35 हजार पथदिवे असून, पहिल्या टप्प्यात 75 हजार पथदिव्यांवरील फिटिंग्ज बदलण्याचे काम टाटा कंपनीला देण्यात आले होते. कंपनीसोबत 12 वर्षांसाठी हा करार करताना देखभाल दुरुस्तिची जबाबदारी कंपनीवरच देण्यात आली आहे. परंतु, एलईडी फिटिंग्जच्या कामात घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने उर्वरीत पथदिव्यांवरील फिटिंग्ज बदलण्याचे काम रखडले होते.

विविध भागांतील नागरिक आणि नगरसेवकांकडून एलईडी फिटिंग्जची मागणी होऊ लागल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी प्रशासनाने एलईडी फिटिंग्ज खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाने खरेदीसाठी दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन 52 हजार पदपथांवरील फिटिंग्ज बदलण्यासंदर्भात निविदा राबविण्यात आली. शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील मे. ईईएसएल कंपनीची निविदा सर्वांत कमी दराची आली आहे.

ही कंपनी उर्वरीत पथदिव्यांवर फिलिप्स कंपनीच्या फिटिंग्ज बसविणार आहे. तसेच पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडेच राहील, असे कंपनीसोबत करार करण्यासंदर्भातील प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, टाटा कंपनीकडून यापूर्वी बसविलेल्या फिलिप्स कंपनीच्या दिव्यांबाबत नगरसेवकांकडून मुख्यसभेत तक्रारी करण्यात आल्या आहेत. बाजारात अन्यही चांगल्या ब्रॅंडच्या आणि किफायतशीर एलईडी असताना केवळ फिलिप्स कंपनीला डोळ्यासमोर ठेवूनच निविदा काढण्यात आल्याची चर्चाही सुरू आहे.

महापालिकेने सर्व पथदिव्यांसाठी उभारलेल्या फिडरची स्काडा सिस्टिम तयार केली आहे. यापूर्वी बसविलेले फिलिप्स कंपनीचे दिव्यांच्या अनुषंगाने ही सिस्टिम तयार करण्यात आली आहे. अन्य कंपनीचे दिवे बसविल्यास पुन्हा नव्याने खर्च करून त्यासाठी स्काडा सिस्टिम तयार करून घ्यावी लागेल, यासाठी फिलिप्स कंपनीच्याच फिटिंग्ज बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व फिटिंग्ज फिलिप्स कंपनीच्या असल्यास नादुरूस्त फिटिंग्ज बदलणे अथवा देखभाल दुरुस्ती करण्यातील अडचणी कमी होणार आहेत.
– श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)