पुणे -…तर काम सोडून जाऊ!

भामा-आसखेड योजनेच्या ठेकेदाराची पालिकेलाच तंबी


योजना अनिश्‍चित काळासाठी लटकण्याची भीती

पुणे – भामा-आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचे काम वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे 2018 मध्ये सुरू होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प तब्बल 2 वर्षे उशिराने म्हणजे 2020 मध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यातच, कामास दिरंगाई होत असल्याने महापालिकेने ठेकेदारांना वारंवार नोटीस बजाविल्याने संतापलेल्या ठेकेदार कंपनीने हे योजनेचे काम अर्धवट सोडण्याची तंबी महापालिकेस दिली आहे. त्यामुळे पालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे.

शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून भामा-आसखेड योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेला या धरणासाठी जागा संपादित केलेल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने गेल्या 3 वर्षांपासून या योजनेचे काम रडत-पडत सुरू आहे. सुमारे 1,414 प्रकल्पग्रस्त आहेत. यातील काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले असून त्यांना जागा देण्यात आली आहे. तर सुमारे 388 प्रकल्पग्रस्तांना प्रतिहेक्‍टरी 15 लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घेतला आहे. त्यासाठी शासनाने महापालिकेकडे पाटबंधारे विभागाने मागणी केलेला 191 कोटींचा सिंचन: पुनर्स्थापना खर्च माफ केला असून त्याबदल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना हेक्‍टरी 15 लाख रुपये याप्रमाणे 131 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यास या 388 प्रकल्पग्रस्तांनी नकार दिला आहे. त्यांना जागेच्या बदल्यात जागाच हवी असल्याने त्यांनी शासनाच्या निर्णयाची माहिती घेऊन काम सुरू करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना काम सुरू करण्यास नकार दिला असल्याने हे काम पुन्हा बंद करण्यात आले आहे.

तीन वर्षांत दीड वर्षे काम बंदच
दरम्यान, या योजनेचे काम गेल्या तीन वर्षांत जवळपास दीड वर्षे बंदच राहिले आहे. त्यामुळे बंद असलेल्या दिवसांसाठी पालिकेकडून हे काम करणाऱ्या कंपनीस प्रत्येक दिवशी 2 लाखांची भरपाई दिली जात होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी या योजनेचे काम करण्यास ग्रामस्थांनी मान्यता दिल्यानंतर ठेकेदाराच्या कामचा वेग मंदावला होता. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराने वेगाने काम करावे यासाठी 2 वेळा नोटीस बजावत दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यात आता ग्रामस्थांनी काम बंद केल्याने ठेकेदार कंपनी चांगलीच संतापली असून त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत यावर लवकर तोडगा न निघाल्यास काम सोडण्याचा इशारा दिला आहे. तर ठेकेदाराने काम सोडल्यास महापालिकेस त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असला, तरी उर्वरित काम पूर्ण करणे, न्यायलयात जाणे अशा बाबींसाठी वेळ जाणार असून त्यामुळे ही योजना अनिश्‍चित काळासाठी लटकण्याची भीती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)