पुणे – ज्ञान, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे – उपराष्ट्रपती

व्यवहार्य, फायदेशीर शेतीसाठी धोरणांची गरज : वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेचा पदवीप्रदान कार्यक्रम

पुणे – कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच कृषी क्षेत्रातील सर्वांना शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेल, असे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी सोमवारी येथे सांगितले.

वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचा पदवीप्रदान कार्यक्रम उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त सचिव वसुधा मिश्रा, संस्थेचे संचालक के. के. त्रिपाठी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, “अनियमित मान्सून, बाजार भावांची अनिश्‍चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्‍वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्‍यकता आहे. शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्‍वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे.

कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र, यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्‍यकता आहे, तरच आपण शाश्‍वत शेतीकडे जाऊ शकतो. शेतीमधून शाश्‍वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.’

यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेती मंजू नाथ, रौप्य पदक विजेता संतूर आरट, कांस्य पदक विजेता सुकुमार एस., यांच्यासह विशेष प्रावीण्य मिळविलेल्या समिक्षा दीक्षित, जॉबल रॉय या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)