असे घडले पुणे : ‘खुन्या मुरलीधर’ मंदिर

पुण्याच्या ऐतिहासिक वारशांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक बाजू असणाऱ्या शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये “खुन्या मुरलीधर’ मंदिराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सदाशिव पेठेत 1797 मध्ये बांधलेली ही वास्तू आज 2019 मध्येही दिमाखात उभी आहे. या मंदिराला पेशव्यांसह क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि चापेकर बंधूंचा इतिहास आहे.

पेशवाई कालखंडामध्ये सावकार असणाऱ्या सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे यांना मुरलीधराचे मंदिर बांधण्याचा दृष्टांत दिला. दृष्टांतानुसार त्यांनी त्यांच्या वाड्यामध्ये म्हणजेच आत्ताच्या अहिल्यादेवी शाळामध्ये खास कारागिरांकडून संगमरवरी मूर्ती तयार करून घेतल्या. दुसऱ्या बाजीरावांनी त्या मूर्ती पाहिल्या. मूर्ती आवडल्याने गद्रयांकडे मूर्तीची मागणी केली, त्यांना गद्रे यांनी नकार दिला. त्यावेळी गद्रे यांनी त्र्यंबकेश्‍वरच्या खरे यांनी रातोरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दादा गद्रे यांनी खरेंच्या हस्ते मुरलीधर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सदाशिव पेठेत करण्याची ठरवली. त्याचवेळी ही गोष्ट पेशव्यांपर्यंत पोहोचली होती.

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू झाली. त्यावेळी बाजीरावांनी तैनात असलेले ब्रिटीश सैन्य मंदिराकडे पाठवले. सावकार असलेल्या गद्रयांनी देखील अरब सैनिकांच्या चौक्‍या नेमल्या होत्या. मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेची पूजा सुरू असतानाच बाहेर मात्र दोन सैन्य एकमेकांविरुद्ध लढत होती. त्यामुळे “मंदिराबाहेर जणू रक्ताचा अभिषेक झाला’ या अर्थाने या मंदिराला “खुन्या मुरलीधर’ असे नाव पडले असल्याचा संदर्भ सापडतो. यानंतर दुसऱ्या बाजीरावाने गद्रे यांची मालमत्ता जप्त करून त्यांना नगरच्या कारागृहात ठेवले. ते 23 वर्ष तुरुंगात होते. त्याकाळात खरे यांनी मंदिर सांभाळले, दैनंदिन पूजा केली. खरे यांनी मंदिर सांभाळल्यामुळे गद्रेंनी खरेंच्या नावे मंदिर आणि आजूबाजूचा परिसराचे दानपत्र केले आणि त्यांनी संन्यास घेतला. आजही मंदिराची संपूर्ण जबाबदारी खरे यांच्याकडेच आहे.

“खुन्या मुरलीधराचे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणातील आहे. तर मंदिराचा लाकडी सभामंडप काही काळानंतर आणून बसवण्यात आला आहे. मंदिराच्या भिंतीवर काढलेली पेशवेकालीन चित्रे आजही पाहायला मिळतात. असा या मंदिराचा इतिहास सांगितला जातो.

या इतिहासाबरोबरच क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुप्त बैठका येत घेत असत. सदाशिव पेठेतील नृसिंह मंदिर येथे शस्त्र चालवण्याचा सराव घेत असत. त्याचबरोबर रॅंडच्या हत्येपूर्वी चाफेकर बंधूंनी बैठका आणि नियोजन याच मंदिरात केल्याची माहिती समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)