पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धा : एनटीपीसी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे – पुणे विमाननगर येथील सिंम्बॉयसिस क्रीडांगणा वर सुरू असलेल्या पुणे महानगर पालिका आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मुख्य संयोजक क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी आयोजित केलेल्या पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पुरूष विभागात उपांत्य फेरीच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात नंदूरबारच्या एनटीपीसी संघाने तुल्यबळ अशा कोल्हापूरच्या शाहू सडोली संघावर 29-24 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. सामना सुरवातीपासूनच अत्यंत चुरशीचा चालू होता.

मद्यंतराला एनटीपीसी संघाकडे 10-8 अशी निसटती आघीडी होती. एनटीपीसी संघाच्या सुरज देसाई व दादा आवाड यांनी अत्यंत सावध खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना शुभम बारमाटे व अभिजीत चव्हाण यांनी उत्कृष्ट पकडी घेत चांगली साथ दिली. शाहू सडोली संघाच्या अमित पाटील व स्वप्नील बेल्हेकर यांनी चांगला प्रतिकार केला. तर विवेक भोईटे याने चांगल्या पकडी घेतल्या मात्र आपल्या संघाला ते विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरूषांच्या दुसऱ्या उपात्य फेरीच्या सामन्यात ओम साई संघ चिखली पुणे संघाने इस्लामपूर व्यायामशाळा सांगली संघाला 47-33 असे नमवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला ओम साई संघाकडे 20-19 अशी निसटती आघाडी होती. ओम साई संघाच्या राकेश कुमार याने केलेल्या वेगवान व खोलवर केलेल्या चढायांच्या जोरावर हा सामना आपल्या कडे झुकविला. त्याला अमोल वडार याने चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इस्लामपूर व्यायामशाळा संघाच्या सौरव कुलकर्णी याने अष्टपैलू खेळ केला तर कृष्णा मदने याने उत्कृष्ट चढाया करीत चांगली टक्कर दिली मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला विभागात पहिला उपात्य फेरीचा सामना राजमाता जिजाऊ संघाने हनुमान संघ बाचणी कोल्हापूर संघाचा 48-16 असा धुव्वा उडवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत अनुभवी अशा खेळाडूंचा भरणा असलेल्या राजमाता जिजाऊ संघाने सुरवातीपासूनच अत्यंत आक्रमक खेळ केला. मध्यंतराला सायली केरीपाळे व नम्रता शिळीमकर यांच्या चौफेर चढायां करीत आपले इरादे स्पष्ट केले. त्यांनी मध्यंतरालाच 27-8 अशी भक्कम आघाडी मिळविली. यामुळे हनुमान बाचणी संघाचे आक्रमण व बचाव दोन्ही खिळखिळे झाले. त्यांना अंकिता जगतापने उत्कृष्ट पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हनुमान संघ बाचणी कोल्हापूरच्या आसावर खोचरी व मृणाली टोणपे यांनी चांगली लढत दिली. तर प्राजक्ता देसाई हिने काही चांगल्या पकडी घेतल्या.

महिलांच्या दुसऱ्या उपात्य फेरीच्या सामन्यात शिवशक्ती संघाने सुवर्णयुग संघावर 35-15 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे17-9 अशी आघाडी होती. सामन्यावर सुरवातीपासूनच शिवशक्ती संघाच्या सोनाली शिंगटे हिने मैदान दणाणून सोडत पकड मिळविली. तीला रक्षा नारकरने उत्कृष्ट पकडी घेत चांगली साथ दिली. सुवर्णयुगच्या सोनाली इंगळे हिने काही चांगल्या पकडी घेत काहीसा प्रतिकार केला. सुवर्णयुग या सामन्यात आक्रमण व बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)