पुणे कबड्डी लीगमध्ये दोन्ही विभागात बारामतीची विजयी वाटचाल

पुणे – बारामती संघाने पुरुष व महिला या दोन्ही विभागात अपराजित्त्व राखले आणि पुणे कबड्डी लीग स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. पुरुषांमध्ये मुळशी, जुन्नर व हवेली यांनीही आव्हान टिकविले. महिलांमध्ये मुळशी, खेड व पिंपरी चिंचवड हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरूष विभागात बारामती संघाने पुरंदर संघावर 44-37 असा विजय मिळविला.मध्यंतराला बारामती संघाकडे 26-14 अशी आघाडी होती. पुरंदर संघाने मध्यंतरानंतर चांगली लढत देत शेवटचे पाच मिऩिटे बाकी असताना 34-34 अशी बरोबरी केली. तथापि नंतर बारामतीच्या खेळाडूंनी वेगवान खेळ करीत विजयश्री खेचून आणली. बारामतीच्या शुभम शेळकेने 8 गुणांसह दोन पकडी घेत 10 गुण वसूल केले.

त्याला आदिनाथ घुले याने 7 गुण व किरण गंगावणे याने 5 गुण मिळवित चांगली साथ दिली. अरविंद पोळ याने 5 उत्कृष्ट पकडी घेत त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पुरंदरच्या अभिजित चौधरी याने 11 गुणांसह एक बोनस व 3 पकडी घेत 15 गुण मिळवून अष्टपैलू कामगिरी केली. अनिकेत रोडे याने 10 गुण मिळविले तर योगेश अक्षुमणी याने 2 पकडी घेत चांगली लढत दिली. मात्र त्यांना विजय मिळविण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात जुन्नर संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघाचा 32-28 असा पराभव केला.

मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघाकडे 19-11 गुणांची आघाडी होती. शिवनेरी जुन्नर संघाच्या पवन कोरडे याने 9 गुणांसह एक पकड घेत 10 गुण मिळविले. त्याला मयुर तांबोळी याने 5 गुण मिळवून चांगली साथ दिली. तर मनोज बोंद्रे याने 3 पकडी घेतल्या. लयभारी पिंपरी चिंचवडच्या विनित कालेकरने खोलवर चढाया करीत 7 गुण मिळविले तर मंगेश शिगवण याने उत्कृष्ट पकडी घेत 7 गुण मिळविले.

पुरुषांच्या आणखी एका सामन्यात मुळशी संघाने खेड संघावर 42-31 अशी मात केली. मुळशी संघाच्या शुभम कुंभार याने 14 गुण मिळविले, गोकुळ तोडकर व किरण मगर यांनी उत्कृष्ट पकडी घेत अनुक्रमे 7 व 5 गुण मिळविले. झुंजार खेड संघाच्या अक्षय वढाणे याने अष्टपैलू खेळ करीत 6 गुण मिळविले. यात एक बोनस व 3 पकडींचा समावेश आहे. निखिल सांडभोरने 12 गुण मिळविले. त्याने दोन पकडीही घेतल्या. मयुर शेरवे याने 3 पकडी घेत चांगला प्रतिकार केला. हवेली संघाने पुणे संघाचा 54-25 असा दणदणीत पराभव केला. हवेली संघाच्या अक्षय जाधव याने उत्कृष्ट खेळ करीत 21 गुण मिळविले. तर तुषार आधवडे याने उत्कृष्ट पकडी घेत 6 गुण मिळविले.

वेगवान पुणे संघाच्या अनिल पाटील याने 9 गुण व सूरज मालुसरे याने उत्कृष्ट पकडी घेत 9 गुण मिळविले. बारामती संघाने पिंपरी चिंचवड संघावर 33-14 गुणांनी विजय मिळविला. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे 25-9 अशी आघाडी होती. त्यांच्या शुभम शेळके 5,आदिनाथ घुले 4 गुण मिळविले. अरविंद पोळ याने उत्कृष्ट पकडी घेत 4 गुण मिळविले. किरण गंगावणे याने 4 गुणांसह एक बोनस व एक पकड घेत अष्टपैलू कामगिरी केली. हवेली संघाने मुळशी संघावर 36-31 असा विजय मिळविला. मध्यंतराला हवेली संघाकडे 17-12 अशी आघाडी होती.

महिला विभागात पिंपरी चिंचवड संघाने पुरंदर संघावर 35-32 गुणांनी विजय मिळविला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 20-15 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवड संघाच्या हर्षदा सोनवणे हिने चांगला खेळ करीत 2 गुण व उक्तृष्ट पकडी घेत 6 असे 8 गुण मिळविले. श्‍वेता माने हिने 5 गुणांसह 3 पकडी घेत 8 गुण मिळविले. तेजल पाटील हिने 6 गुण मिळवित त्यांना चांगली साथ दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)