पुणे – गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर “जेसीबी’

कबुतरांच्या ढाबळीतून चालायचे बेकायदा कृत्ये


जनात वसाहतीत दत्तवाडी पोलिसांनी फिरवला


राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालायचे गोरखधंदे

– संजय कडू

पुणे – दोन गटांतील वर्चस्वातून एका टोळीच्या म्होरक्‍याचा खून झाल्याची घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडली होती. यामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर दत्तवाडी पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचा धडाका लावला आहे. महापालिकेच्या जागेत बेकायदा शेड उभारणी करून असलेल्या अड्ड्यांवर थेट “जेसीबी’ फिरवून ते उखडून फेकण्यात आले आहेत. यामुळे गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे. त्यांचे अड्डेच नेस्तनाबूत झाल्याने बेकायदा धंद्यांनाही आळा बसला आहे. विशेष म्हणजे, हे धंदे स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू होते.

शहरातील गुन्हेगारी प्रामुख्याने दाट वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात वसली आहे. छोट्या-मोठ्या टोळ्या खंडणी, हाणामारी, हप्ते वसुली, जुगारअड्डे अशा माध्यमांतून येथे कार्यरत आहेत. यात प्रामुख्याने येरवडा, दत्तवाडी, कोंढवा, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, कोथरुड परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व आहे. पोलिसांनी मागील काही वर्षांत मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके “मोक्का’ अंतर्गत कारागृहात धाडले आहेत. मात्र त्यांच्या दुसऱ्या फळीने त्यांची जागा घेतली आहे. तर, काही नव्याने टोळ्या निर्माण झाल्या आहेत. यातच अल्पवयीन गुन्हेगारांचेही प्रमाण मोठे वाढले आहे. यातूनच अनेक छोट्या मोठ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वाचे वाद उफाळून येत आहेत. यातून हाणामारी, खुनाचा प्रयत्न आणि खुनाचे प्रकार घडत आहेत.

“टार्गेट’ जनता वसाहत
शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जनता वसाहतीलाही टोळी प्रकाराने प्रकाराने पोखरले आहे. “चॉकलेट सुन्या’ने केलेल्या खुनानंतर इथली गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली. याची वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने दखल घेतल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी येथील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारी टोळ्यांनी बांधलेली सुमारे 9 ते 10 अनधिकृत शेड जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामुळे बेकायदा धंद्यांना आळा बसला आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.

जनता वसाहतीमध्ये डोंगराच्या चढावर अचानक कबुतरांच्या ढाबळीचे प्रमाण वाढले होते. येथे दिवसभर कबुतरांना उडवले जात होते. काही गुन्हेगारी टोळ्यांनी स्वत:च्या ढाबळी उभारल्या होत्या. येथे नावालाच कबुतरे पाळली जात होती. मात्र, रात्री या जागेचा वापर जुगार, दारू, यांसाठी केला जात होता. ही बाब लक्षात घेऊन कबुतराच्या ढाबळीच्या रुपातील हे गुन्हेगारीचे अड्डे दत्तवाडी पोलिसांनी समूळ उखडले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांच्या पथकाने केली
– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)