मतदारांमध्ये पुणे आघाडीवर 

– मुंबई उपनगर दुसऱ्या, तर ठाणे तिसऱ्या क्रमाकांवर 
– राज्यात 8 कोटी 73 लाख मतदार करणार मतदान 

मुंबई  – 12 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात यंदा आगामी लोकसभा निवडणूकीत 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक आघाडीवर आहे. पुण्यामध्ये पुरूष व महिला मतदारांची एकूण संख्या 73 लाख 63 हजार 812 एवढी असून मुंबई उपनगर दुसऱ्या, तर ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमाकांवर आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या मतदार याद्यांच्या पुर्नरिक्षणाचे काम हाती घेतले होते. या पुर्नरिक्षणामध्ये नवीन मतदारांची नोंद करतानाच बोगस व दुबार मतदारांची नावे वगळून आयोगाने मतदारांची यादी अंतिम केली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या मतदारांमध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक आघाडीवर आहे. पुण्यात 38 लाख 51 हजार 445 पुरूष, तर 35 लाख 12 हजार 228 महिला आणि 139 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरात 38 लाख 15 हजार 271 पुरूष आणि 31 लाख 86 हजार 148 महिला तसेच 481 तृतीयपंथीय मिळून एकूण 70 लाख 1 हजार 900 मतदार आहेत.
ठाण्यात पुरूष (33,21,790), महिला (27,70,957) मिळून तब्बल 60 लाख 93 हजार 87 मतदार आहेत. तर मुंबई शहरात पुरूष 13 लाख 44 हजार 955 आणि महिला 11 लाख 11 हजार 437 व 105 तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.

7 लाख 29 हजार मतदार वगळले

निवडणूक आयोगाने घेतलेल्या पुर्नरिक्षणामध्ये संपूर्ण राज्यभरातून 7 लाख 29 हजार 335 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच 93 हजार 524 नावे कमी करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ मुंबई शहरातून 59 हजार 691, तर उपनगरातून 45 हजार 142 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर पुर्नरिक्षणामध्ये नव्याने 35 लाख 68 हजार 352 मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. नव्याने नोंदणी झालेल्यामध्ये 17 लाख 43 हजार 259 पुरूष, तर 18 लाख 24 हजार 976 महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यात एकूण 2086 तृतीय पंथीय मतदारांची नोंद झाली असून यामध्ये मुंबई उपनगरात सर्वाधिक (481) तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)