पुण्याची ओळख “योग सिटी’ अशी करणार

-महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांची ग्वाही
-अपर इंदिरानगर ते पर्वती दर्शन भागात प्रचार

पुणे -“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगशास्त्राला जागतिक मान्यता मिळवून दिली. पुणे शहरात योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रथितयश संस्था आहेत. योगावरील संशोधक, प्रशिक्षक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योग साधना करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. या सर्वांना एका शृंखलेत गुंफून योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आवश्‍यक असणाऱ्या सुविधा देऊन पुणे शहराची ओळख जगाच्या नकाशावर “योग सिटी’ अशी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार’ असल्याचे आश्‍वासन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.

“पतंजली योग केंद्राने दिलेला पाठिंबा आपण स्वीकारत असून, पुणेकरांच्या विश्‍वासाला तडा जाईल असे कोणतेही वर्तन माझ्या हातून घडणार नाही,’ अशी ग्वाही बापट यांनी दिली. भारत स्वाभिमान न्यासाने रामनवमी आणि रामदेवबाबांच्या संन्यास दीक्षा दिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या योग शिबिराला बापट यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे, महेश लडकत, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, रामकुमारी राठी, गोविंदराव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणेकरांना मिळणार शुद्ध आणि पुरेसे पाणी
“पुण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिकांना शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार असल्याची ग्वाही गिरीश बापट यांनी दिली. बापट यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदारसंघात अपर इंदिरा नगर ते पर्वती दर्शन असे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. “पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. महायुतीने हाती घेतलेल्या बहुचर्चित आणि प्रलंबित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. धरण साठ्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले जात आहे.

भामा-आसखेड प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होईल. त्यामुळे नगर रस्त्यावरील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. पर्वती येथे 250 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि पर्वती ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे,’असे बापट म्हणाले. आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजू शिळीमकर, राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, रूपाली धाडवे, महेश वाबळे, साईदिशा माने, महेश लडकत, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अशोक हरणावळ आदी यावेळी उपस्थित होते.

शहरातील रिक्षा संघटनांचा बापट यांना पाठिंबा
शहरातील विविध रिक्षा संघटनांनी गिरीश बापट यांना पाठिंबा जाहीर केला. “रिक्षावाले’ हा या शहराचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्‍नांवर अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. व्यवसाय कर, आरटीओतील सुधारणा, रिक्षा स्टॅन्डची सुविधा, विमा, आरोग्य तपासणी असे प्रश्‍न मार्गी लावले. राज्यात 30 लाखांहून अधिक रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे रिक्षावाल्यांना सामाजिक, आर्थिक आणि वैद्यकीय लाभ मिळू शकतील, असे बापट यांनी यावेळी बोलताना सांगितले. खासदार अनिल शिरोळे, शिवसेनेचे शहर प्रमुख महादेव बाबर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, भाजपचे शहर सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांनी मार्गदर्शन केले. रिक्षा संघटनेचे बाबा शिंदे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे, शिवनेरी संघटनेचे अशोक साळेकर, स्वारगेट संघटनेचे हेमंत जाधव, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे लखन लोंढे, जीवन धुमाळ, प्रदीप भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)