पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही पुणेकरांची क्रीडा चळवळ

..आणि मॅरेथॉन संपन्न झाली.

पंतप्रधान राजीव गांधींच्या वेळची आठवण विशेष महत्वाची आहे. ते ज्यादिवशी येणार होते ते रद्द झाले. त्यांना दुसऱ्या दिवशी येणे शक्‍य होते त्यामुळे अख्खी मॅरेथॉन पहिल्या दिवशी रद्द करून दुसऱ्या दिवशी घेतली गेली. त्यावेळी मोबाईल अथवा सोशल मीडिया नव्हते. 35 ते 40 हजार धावपटूंचा सहभाग होता. अशावेळी प्रत्येकाला कार्यक्रमातील बदल कळवणे जिकिरीचे होते. मात्र जबरदस्त संघटन कौशल्यातून प्रत्येकाला निरोप गेला आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन दिमाखात संपन्न झाली. प्रबळ संघटन आणि उत्कृष्ट संयोजन याचीच ही चुणूक होती.

यंदाची पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही 33वे वर्ष साजरे करीत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करण्यात पुण्याचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले तत्कालिन खासदार सुरेश कलमाडी, प्रल्हाद सावंत आणि आंतरराष्ट्रीय क्रिडापटू रमेश तावडे यांचे मोठे योगदान होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शनही मॅरेथॉनला लाभले.

33 वर्षांपूर्वी सुरू झालेली मॅरेथॉन आता पुणेकरांची चळवळच बनली आहे. देशातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि यापासून प्रेरणा घेऊन पुण्यासह संपूर्ण देशभर अनेक मॅरेथॉन सुरू झाल्या. पुण्यातील मॅरेथॉनचे मोठे यश म्हणजे शारीरिक तंदुरूस्तीसाठी गांभिर्याने पळणे (सीरियस रनिंग) या कल्पनेने येथे मूळ धरले आणि आता संपूर्ण शहरभर सकाळी व्यायामासाठी चालणे अथवा पळणे हा हजारोंचा नित्यक्रमच बनला आहे.

33 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 42.195 किलोमीटरच्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा मार्ग पूर्वी पुणे शहराच्या मुख्य भागातूनच जात होता. आता पुणे खूप वाढले आहे आणि मॅरेथॉनच्या मार्गातही अनुरूप बदल झाले आहेत. एका अर्थाने पुणे शहराचे जुने रूप आणि नवे रूपही या मॅरेथॉनने अगदी जवळून पाहिले आहे असे म्हणता येईल.

पूर्वी मध्यवस्तीतून मॅरेथॉन जाताना चौका-चौकात कमानी उभारल्या जायच्या, रांगोळ्या काढल्या जायच्या, मार्गावर खेळाडूंचे फुले व गॅसचे फुगे, ढोल लेझीम याद्वारे स्वागत केले जायचे. हजारो पुणेकरांनी रस्त्यावर उतरून मॅरेथॉनमधील धावपटूंचे स्वागत करण्याची ती परंपरा अगदी आजही चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि पुणेकरांचा उत्साह लक्षात घेऊन संपूर्ण वर्षभर मॅरेथॉन विषयक उपक्रम करण्याचा आमचा संकल्प आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये दरवर्षी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू भाग घेतात. ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने तर एका वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला “एशियन चॅम्पीयनशिप’चा दर्जा दिला होता. त्यावर्षी तर सर्वाधिक 350 हून अधिक परदेशी धावपटू सहभागी झाले होते.

सुरेश कलमाडी यांच्या प्रयत्नांमुळे देशाचे दोन पंतप्रधान पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आले होते ही विशेष बाब मानावी लागेल. पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची शान गगनाला भिडली. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला राष्ट्रीय नेते शरद पवार व तत्कालिन मुख्यमंत्रीपदी असणारे मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे हे सारे आले होते. यासोबतच अनेक केंद्रीय मंत्रीही आले होते. दरवर्षी दुरदर्शनवर या मॅरेथॉनचे थेट प्रेक्षेपण होते ही देखील विशेष बाब मानावी लागेल.

यंदा तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन यूट्यूबवर देखील ही मॅरेथॉन थेट प्रक्षेपीत करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केला आहे. तसेच पुण्यातील मॅरेथॉन भवन येथे क्रीडा साहित्याचे “एक्‍सपो’ हे प्रदर्शन पहिल्यांदाच भरवण्यात आले आहे. पुढीलवर्षी पासून हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात होईल. या मॅरेथॉनमध्ये शाळकरी मुलांचा मोठा सहभाग आहे.

पुण्यातील अनेक शाळांमधील विशेषतः महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता यावे यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले गेले नाही. या लहान वयातच त्यांच्यात आवड निर्माण झाल्यास तरूण वयातही ते मॅरेथॉनमध्ये सहभागी होत राहतील. क्रीडाप्रेमी बनतील, मॅरेथॉनचे आधारस्तंभही बनतील. ही मॅरेथॉन त्यांची आहे, त्यांच्या पालकांची आहे, पुणेकरांची आहे. पुणे महानगरपालिकेचे यात चांगले सहकार्य लाभते. यासोबतच अनेक संस्थांचे डॉक्‍टर्स, पोलिस, वाहतूक पोलिस यांचे अनमोल सहकार्य लाभत असते.

प्रत्येक शहराचे आपापले मानबिंदू असतात, वैशिष्ट्‌ये असतात. पुणे शहराच्या पहिल्या टप्प्यात सार्वजनिक गणेशोत्सव, भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या पुढाकाराने सुरू झालेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव आहे. तर दुसर्या टप्प्यात पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन हे देखील पुण्याचे मानबिंदू बनले आहे. जगाच्या नकाशावर पुणे अधोरेखित करण्यात पुणे फेस्टिव्हल व पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यांचा निश्‍चितच मोठा वाटा आहे हे निश्‍चित.

अशी मॅरेथॉन सुरू करणे कदाचित सोपे असते मात्र सातत्याने वर्षानुवर्षे चालू ठेवणे अवघड असते. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने हे साध्य केले. याचे श्रेय सहभागी धावपटू, कार्यकर्ते यांबरोबरच पुणेकरांना देखील आहे असे मी मानतो. किंबहुना पुणेकरांनीच मॅरेथॉन ही चळवळ बनवली असे मानावे लागेल.

-अॅड. अभय छाजेड. ट्रस्टी, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : 9822023429


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)