पुणे – रस्त्याच्या कामाची थर्ड पार्टी चौकशी करा

सर्वपक्षीय नगरसेवकांची सभागृहात मागणी : स्वारगेट-कात्रज रस्ता

पुणे – स्वारगेट-कात्रज बीआरटी रस्त्यांचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, ते पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च होऊनही जागोजागी अर्धवट कामे करण्यात आली आहेत. या कामात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संपूर्ण कामाची थर्ड पार्टी चौकशी करावी, अशी मागणी सातारा रस्ता परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी महापालिकेच्या मुख्य सभेत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वारगेट-कात्रज रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. जागोजागी कामे सुरू आहेत. साई मंदिर, दुगड चौक (पुष्पमंगल), शंकर महाराज मठ आदी अपघाती क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी उपाययोजना करावयाच्या सोडून संपूर्ण रस्त्याची दुरवस्था केली आहे. या कामासाठी आतापर्यंत 70 ते 75 कोटी रुपये खर्च करूनही ठोस कामे केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे, प्रवीण चोरबेले, वर्षा तापकीर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे, अश्‍विनी कदम यांनी रस्त्याच्या कामावर आणि कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी रस्त्यावर कोणत्या कोणत्या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत, कोणत्या ठिकाणची कामे अर्धवट आहेत, भविष्यात कोणती कामे केली जाणार आहेत, याची माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, अश्‍विनी कदम यांनी झालेल्या कामाची आणि खर्च केलेल्या निधीची थर्ड पार्टी चौकशी करण्याची मागणी केली. हीच मागणी कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी लावून धरली. आतापर्यंत किती काम झाले, उर्वरीत काम केव्हा पूर्ण होणार आहे, याची संपूर्ण माहिती सभागृहाला देण्याची मागणी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केली.

कामाची आणि खर्चाची होणार चौकशी
यासंदर्भातील पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवकांचे समाधान न झाल्याने महापालिकेचे अति. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कामातील त्रुटींची नोंद घेतली असून, कामाची आणि खर्चाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सभागृहाला सांगितले. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. ज्या सदस्यांच्या तक्रारी आहेत त्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही निंबाळकर यांनी सभागृहात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)