पुणे – वाढता वाढे वेतनाचा खर्च!

15 वर्षांत पाच पट वाढ : अंदाजपत्रक फुगले

पुणे – उत्पन्न घटत असतानाच दुसऱ्या बाजूला महापालिकेचा महसुली खर्च (कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च ) गेल्या पंधरा वर्षात पाच पटींनी वाढला असल्याचे समोर आले आहे. राज्यशासनाच्या ग्रेड-पेच्या तुलनेत महापालिका कर्मचाऱ्यांना जास्त असलेले वेतन तसेच वेतन आयोगासह इतर वेतनाच्या अनुषंगाने हा खर्च वाढल्याचे चित्र आहे. त्यातच, महापालिका अधिनियमानुसार, हा खर्च 32 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असू नये, हे बंधन असल्याने हा खर्च देण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी 600 ते 800 कोटींनी अंदाजपत्रक फुगवावे लागत असल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेत सुमारे 17 हजार 500 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचे भत्ते तसेच निवृत्ती वेतनासह इतर सुविधांचा खर्च मोठया प्रमाणात वाढलेला आहे. महापालिकेस मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 32 टक्के पेक्षा हा खर्च कमी असणे अपेक्षित आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात हा खर्च सुमारे 28 टक्के ( 1,674 कोटी रुपये) आहे.

2005-06 मध्ये हा वेतनाचा खर्च 287 कोटी 87 लाख रुपये होता. तर 2010-11 मध्ये हा खर्च 600.17 कोटी होता. तर 2015-16 मध्ये हा खर्च 1,200 कोटींवर पोहचला असून 2016 मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हा खर्च तब्बल 1,551 कोटींवर पोहचला आहे. म्हणजेच गेल्या पंधरा वर्षांत तो जवळपास पाच पटींनी वाढला आहे. त्यातच आता सातवा वेतग आयोग लागू केला असल्याने वेतनातील फरक, नवीन सुधारीत वेतन श्रेणीमुळे या खर्चात आणखी वाढ होणे अपेक्षित असून 2019-20 च्या अंदाजपत्रकात वेतनासाठी सुमारे 1,674 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

भांडवली खर्चावर परिणाम
या वाढत्या वेतनावरील खर्चाचा परिणाम भांडवली कामांवर होत असल्याचे चित्र आहे. 2005-06 मध्ये सुमारे 601 कोटींची भांडवली कामे झाली. तर 2010-11 मध्ये हा आकडा 1हजार 54 कोटी झाला. तर 2015-16 मध्ये 1 हजार 741 कोटींची भांडवली कामे झाली आहेत. तर 2019-20 मध्ये सुमारे 3 हजार 131 कोटींची भांडवली कामे होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, महसुली आणि भांडवली कामांची आकडेवारी पाहता वाढत्या वेतनाचा ताण विकासकामांवर होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)