पुणे – अनधिकृत शंभर नळजोड बंद!

तीव्रता वाढणार : अघोषित पाणीकपातनंतरची मोठी कारवाई

पुणे – दर गुरुवारी पाणीबंद, कमी वेळ पाणीपुरवठा या सगळ्या माध्यमातून महापालिकेने अघोषित पाणीकपात सुरू केली आहे. आता अनधिकृत नळजोडांवरील कारवाईला महापालिकेने सुरुवात केली आहे. सुमारे 100 नळजोडांवर महापालिकेने कारवाई केली असून, ही कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाने कमी पाणी उचलण्याविषयीचा फतवा काढल्यानंतर महापालिकेची पळापळ झाली. त्यानंतर पाणीवाटपाच्या वेळेची पुनर्रचना करण्यात आली. पाणीवाटपाच्या नावाखाली पाणीकपात महापालिकेने सुरू केली. त्यामुळे अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

या सगळ्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले असून, त्याचा पहिला हातोडा हा अनधिकृत नळजोडांवर पडला आहे. वेळोवेळी ही कारवाई होतच असते; परंतु उन्हाळ्याची चाहूल आणि धरणातील कमी पाणीसाठा, भविष्यातील पाण्याचे संकट या सगळ्याचा विचार करता ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत ही कारवाई सुरू असून, सर्वांधिक कारवाई धनकवडी भागात करण्यात आली आहे. अन्य ठिकाणीही आता ही कारवाई अधिक जोमाने करण्यात येणार आहे.

सध्या दीड ते दोन इंच आणि त्यापेक्षा मोठ्या अनधिकृत जोडांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्याप्रमाणात होतोच परंतु, अनधिकृतपणे पाणीपट्टी न भरता जास्त पाणी वापरले जात आहे, अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू राहणार आहेच, परंतु त्याचबरोबर एका घरासाठी पाव, अर्धा आणि एक इंची लाईन अनधिकृतपणे घेणाऱ्यांवरही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता ऑगस्टपर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. पाणीपट्टी न भरता अनधिकृतपणे त्या भागातील मुख्य लाईनमधून नळजोड घेतले जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. अशा नळजोडांवर कारवाई केली जात आहे आणि यापुढे ती मोठ्याप्रमाणावर केली जाणार आहे.
– व्ही. जी. कुलकर्णी, विभाग प्रमुख, पाणीपुरवठा, महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)