पुणे – वाहतूक पोलिसांनी थांबविले आणि वाहनावर कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यास, वाहनचालकाला चक्क वाहतूक पोलिसांकडून “आभार’ कूपन मिळणार आहे.
दिवसेंदिवस वाहतूक पोलिसांची वाढती कारवाई पाहता बेशिस्त वाहनचालकांमध्ये चांगलीच जरब निर्माण झाली आहे. वाहतुकीचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस वाहन थांबवून कारवाई करतात. कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. आता मात्र कारवाई करणारे पोलीस वाहनचालकाच्या नियमपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी “आभार’ कूपन देणार आहेत.
वाहनचालकाला मिळालेल्या “कूपन’ क्रमांकानुसार वाहनचालकाला हॉटेल्स, विविध दुकानांमध्ये सवलत दिली जाणार आहे. मात्र, नागरिकांना किती सवलत द्यायची, याचा निर्णय संबंधित व्यावसायिकांचा असणार आहे. वाहतूक पोलीस आणि व्यावसायिकांकडे असणाऱ्या “ऍप’च्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून दुकानदारांना “आभार’चे “डिस्प्ले कार्ड’ आणि “स्टॅन्ड’ सुद्धा देण्यात येणार आहेत.
योजनेमध्ये सुमारे 135 पेक्षा अधिक व्यावसायिकांचा सहभाग आहे. दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुमारे 100 वाहनचालकांना “कूपन’ देण्यात आली आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा यंत्रणेमध्ये विचार करण्यात येत नव्हता. या योजनेच्या माध्यमातून नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासह नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे खासगी क्षेत्रांमध्ये “डिस्काऊंट कूपन’ सारख्या योजना राबविण्यात येतात. शहरामध्ये राबविल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये शंभरपेक्षा अधिक व्यावसायिकांनी स्वत:हून सहभाग नोंदविला आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (वाहतूक)
कशी असेल “कूपन सिस्टीम’
नाकाबंदी दरम्यान वाहन थांबविल्यानंतर वाहतूक पोलिसांकडे असणाऱ्या ऍपनुसार वाहनावर कोणत्याही प्रकारचा दंड प्रलंबित नसेल, वाहनचालकाकडे आवश्यक कागदपत्रे असल्यास वाहनचालकाला “डिस्काऊंट कूपन’चा तपशिल मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे.
मोबाइलवर आलेल्या “कूपन’ क्रमांकानुसार वाहनचालकांना हॉटेल्स आणि दुकानांमध्ये डिस्काऊंट मिळणार आहे.