पुणे – सिग्नलवर प्रवासी उतरल्यास एसटी बसचालकाला पडणार महागात

पुणे – सिग्नलला बस थांबल्यानंतर माणुसकीच्या भावनेतून प्रवाशांला बसमधून उतरु देणे, एसटी महामंडळाच्या वाहकांना आणि चालकांना चांगलेच महागात पडले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 250 वाहक आणि चालक जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर महामंडळाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना समजही देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि छोट्या मोठ्या अपघातांना आळा घालण्यासाठी बसेस थांबविण्याची काही नियमावली तयार करण्यात आली आहे, त्यानुसार वाहक आणि चालकाने या थांब्यावरच प्रवाशांना बसमधून उतरू द्यावे, असे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शहराच्या मध्यवस्तीत अथवा महामार्गावरील सिग्नलला बस थांबल्यानंतर काही प्रवासी बसमधून उतरण्यासाठी वाहकांना विनंती करतात. वाहकही माणुसकीच्या भावनेतून प्रवाशांना मदत करत असतात, हे वास्तव असले तरी पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाला त्याची कल्पना नसल्याने आणि एकदम दरवाजा उघडला जात असल्याने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी सिग्नलला बस थांबल्यानंतर प्रवाशांना उतरण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी सूचना वाहतूक पोलीसांच्या वतीने एसटी महामंडळाच्या प्रमुखांना करण्यात आली होती. त्यानुसार या सूचनांचे पालन करावे अशी समज एसटी महामंडळाच्या वतीने वाहक आणि चालकांना देण्यात आली होती. मात्र, या नियमांचे फारसे पालन होत नसल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले होते. त्याची गंभीर दखल घेत महामंडळाच्या वतीने महत्वाच्या सिग्नलवर साध्या वेषातील खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यानुसार या पथकांनी त्याबाबतची छायाचित्रे आणि व्हिडिओ शुटिंग काढून त्याचा अहवाल आगार प्रमुखांना दिला होता. या अहवालानुसार अडीचशे वाहक आणि चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)