पुणे – “लिलाव कमिटीत मुख्य लेखापाल कसे’

सदस्यांचा मुख्यसभेत आयुक्‍तांना सवाल

पुणे – महापालिकेतील संगणक साहित्य खरेदी आणि जुन्या साहित्याच्या लिलावासाठी नेमलेल्या कमिटीत मुख्य लेखापालांचा समावेश कसा, असा प्रश्‍न सोमवारी महापालिका मुख्यसभेत उपस्थित करण्यात आला. महापालिकेतील प्रत्येक निविदा प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संदर्भातील विषयांचे लेखापरीक्षण मुख्यलेखापालांना करावे लागते, त्यामुळे त्यांना खरेदी वगैरे प्रक्रियेत सामावून घेता येते का, असाही प्रश्‍न यावेळी विचारण्यात आला. याबाबत विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात येईल, असे उत्तर आयुक्‍त सौरभ राव यांनी मुख्यसभेत दिले.

संगणकासंबंधी साहित्याचा लिलाव आणि खरेदी करण्यासाठी महापालिकेने एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये महापालिकेचे माहिती-तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह मुख्य लेखापाल अंबरिश गालिंदे यांचाही समावेश करण्यात आला आहे. गालिंदे हे मुख्य लेखापाल आहेत. त्यामुळे त्यांची त्या पदावर नियुक्‍ती करताना त्यांना महापालिकेच्या कोणत्याही खरेदी किंवा तत्सप प्रक्रियेत कायद्यानुसार भाग घेता येत नाही. असे असताना या कमिटीत त्यांना का घेण्यात आले, असा प्रश्‍न महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला. यावर विधी विभागाचा अभिप्राय विचारला का, असेही शिंदे म्हणाले.

त्यावर आयुक्‍त खुलासा करताना म्हणाले, ही कमिटी अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली नेमली आहे. संगणक क्षेत्रातील नाविण्यपूर्ण विषयांचा अभ्यास करणे आणि महापालिकेच्या चलनवलनाला उपयोगी पडतील अशा संगणकीय बाबींविषयी सल्ला देणे असे या कमिटीचे काम आहे. सदस्यही यामध्ये आपले मत मांडू शकतात अथवा आपला अनुभव शेअर करू शकतात. तरीही याबाबत आम्ही विधी विभागाचा अभिप्राय घेऊ.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)