पुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन

मूत्रपिंड प्रत्यारोपणात डॉक्‍टरांना यश


ब्रेन डेड युवकाच्या अवयवदानातून नवसंजीवनी

पुणे – अवयव दानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे अपघातात जखमी झालेल्या 26 वर्षीय ब्रेनडेड युवकाच्या अवयवदानातून चार जणांना जीवनदान मिळाले आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात डॉक्‍टरांच्या टीमला यश आले. दरम्यान, हृदय, यकृत आणि एक मुत्रपिंड बाहेरच्या हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना दान करण्यात आले, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वडील शेतकरी आणि आई गृहिणी, घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. त्याला परिस्थिती पालटायची होती, आई, बापाच्या कष्टांना संपवायचे होते, म्हणून तो तरूण पुण्यात नोकरीसाठी आला. भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागला आणि आनंदाचे दिवस सुरू झाले. आई, बापाला वाटले आता सुखाचे दिवस आले. मात्र, या आनंदावर काही महिन्यांतच दु:खाचा डोंगर कोसळला. दि. 14 फेब्रुवारी रोजी या युवकाचा पुणे-सातारा महामार्गावर अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ससून रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवस ट्रॉमा अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, दि. 20 रोजी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

-Ads-

नातेवाईकांचे समुपदेशन 
तरूण मुलगा गेल्यामुळे आई-वडिल आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीत ससून रुग्णालयातील समुपदेशन टीमने अवयवदान करण्याबाबत नातेवाईकांचे समुपदेशन केले. नातेवाईकांनी संमती दिल्यानंतर झेड.टी.सी.सी.च्या प्रतिक्षा यादीनुसार हृदय आणि यकृत पुण्यातील खासगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात आले. तर, एक मूत्रपिंड नाशिकच्या खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. दुसरे मूत्रपिंड ससून सर्वोपचार रुग्णालयातील महिला रुग्णाला दान देण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. भालचंद्र कश्‍यपी, डॉ. अमेय पाटील, डॉ. अभय सदरे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. रोहन धारापवार, डॉ. शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. योगेश गवळी, डॉ. गायत्री तडवलकर यांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना रुखसाना सय्यद, अर्जुन राठोड व आकाश साळवे यांचे सहकार्य लाभले.

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)