सेर्गेय फोमीन आणि मनचया सवांगकिइ यांना दुहेरी मुकुटाची संधी

भारताच्या सिद्धांत बांठियाचा अंतिम फेरीत प्रवेश; एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – मुलांच्या गटात उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन व मुलींच्या गटात थायलंडच्या मनचया सवांगकिइ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेतेपद पटकावण्या बरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना येथिल टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावचा 6-2, 4-2 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. हा सामना 59मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिद्धांतने आक्रमक खेळ केला. या सेटमध्ये चौथ्या व सहाव्या गेममध्ये डॉस्टनबीकेची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2असा सहज जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या डॉस्टनबीकेला अखेरपर्यॅंत सूर गवसला नाही.

सामन्यात 2-1अशी स्थिती असताना सिद्धांत याने बॅकहॅंड व फोरहॅंडचे सुरेख फटके लावत 4 थ्या गेममध्ये डॉस्टनबीकेची सर्व्हिस भेदली व 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिद्धांतने आपली सर्व्हिस राखली व 6व्या गेममध्ये पुन्हा डॉस्टनबीकेची सर्व्हिस रोखली. सामन्यात 4-2अशा सिद्धांत आघाडीवर असताना डॉस्टनबीकेला दुखापत झाल्यामुळे त्याने सामना सोडून दिला. यावेळी सिद्धांत म्हणाला कि, सामन्याच्या सुरुवातीला माझ्यावर दडपण होते. पण पहिला गेम जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास दुणावला व डॉस्टनबीकेने केलेल्या चुकांचा फायदा घेत सामन्यात विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने तिसऱ्या मानांकित कोरियाच्या सीओन यॉंग हनचा 6-4, 6-3असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 15मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये फोमीनने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत सीओन यॉंग हनची 6व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये फोमीनने चतुराईने खेळ करत सीओन यॉंग हनची 6 व 8व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3असा जिंकून विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताच्या सिद्धांत बांठियासमोर उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनचे आव्हान असणार आहे.

मुलींच्या गटात उपांत्य फेरीत थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने हॉंग कॉंगच्या अव्वल मानांकित वांग हॉंग यी कोडीवर टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-2 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना 1तास 45मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत थायलंडच्या आठव्या मानांकित मई नपात निरुदोर्नने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुगरोचा 2-6, 6-3, 6-0असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 2तास 3मिनिटे चालला.

दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात मलेशियाच्या क्रिस्टीन डीडीयर चिन व उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन यांनी भारताच्या देव जावीया व मन शहा यांचा 7-6(7-5), 6-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात जपानच्या हिमारी सातो व थायलंडच्या मनचया सवांगकिइ यांनी जपानच्या साकी इमामुरा व थायलंडच्या पुन्नीन कोवापिटुकटेड यांचा7-5, 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीतील विजेत्या खेळाडूंना 210 आयटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना 130 आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एचसीएलचे रजत चदोलीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, स्पर्धा सुपरवायझर लिना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल-

उपांत्य फेरी : मुले – सिध्दांत बांठीया(भारत)(4) वि.वि.डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान)(1)6-2, 4-2सामना सोडून दिला, सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)वि.वि.सीओन यॉंग हन(कोरिया)(3)6-4, 6-3.
मुली – मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि.वांग हॉंग यी कोडी(हॉंग कॉंग)(1)7-6(4), 6-2 1 तास 45मिनिटे, मई नपात नरुदोर्न (थायलंड) (8) वि.वि.प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)2-6, 6-3, 6-0.

दुहेरी : अंतिम फेरी : मुले – क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(3) वि.वि.
देव जावीया (भारत)/मन शहा (भारत)7-6 (7-5), 6-3,
दुहेरी गट : अंतिम फेरी : मुली – हिमारी सातो (जपान)/मनचया सवांगकिइ (थायलंड) वि.वि. साकी इमामुरा (जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड (थायलंड) 7-5, 6-3.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)