पुणे – इयत्ता अकरावीच्या सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी येत्या 22 व 23 मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीने मार्गदर्शन वर्ग घेण्यात येण्यात येणार आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी माहिती पुस्तिकांचे वितरण सध्या चालू आहे. येत्या 25 मे पासून प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग-1 व भाग-2 कसा भरावा, आरक्षणानुसार कोणती कागदपत्रे सादर करावी, ऍप्रुव्हल कशाप्रकारे दिले जाणार आहे याची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे. अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व माहिती त्यांना सांगण्यात येणार आहे.
वेळापत्रक जाहीर
पुणे शहर विभागासाठी 22 मे रोजी सकाळी 11 ते 12 वा., पर्वती, धनकवडी, स्वारगेट या विभागासाठी दुपारी 1 ते 2 या वेळेत सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. सिंहगड विभागासाठी दुपारी 1 ते 2 यावेळेत दांडेकर पुलाशेजारील रावसाहेब पटवर्धन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवजीनगर, औंध, पाषाण विभागासाठी दुपारी 3 ते 4 या वेळेत शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील असेंब्ली हॉलमध्ये, हडपसर विभागासाठी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हडपसरमधील सी.बी.तुपे कन्या शाळेच्या सभागृहात मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत.
पिंपरी, भोसरी विभागासाठी 22 मे रोजी दुपारी 11 ते 12 व चिंचवड, निगडी विभागासाठी दुपारी 3 ते 4 या वेळेत आकुर्डी येथील म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग घेण्यात येणार आहेत.
येत्या 23 मे रोजी कॅम्प, येरवडा विभागासाठी सकाळी 11 ते 12 यावेळेत रुबी हॉल शेजारील नौरोजी वाडिया कॉलेज मधील टाटा असेंब्ली हॉल, कर्वेनगर व कोथरुड विभागासाठी कर्वे रोड येथील कलमाडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी 3 ते 4 यावेळेत मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. सर्व झोन प्रमुख, झोन सहायक, पर्यवेक्षीय अधिकारी, झोन संपर्क प्रमुख यांना मार्गदर्शन वर्गाच्या नियोजनाबाबत सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मार्गदर्शन वर्ग यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही जोरदारपणे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थी व पालकांसाठी विभागनिहाय मार्गदर्शन वर्ग घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी विभागनिहाय मार्गदर्शन वर्ग घेण्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. झोन समिती व मार्गदर्शन केंद्र समिती यांच्या समन्वयाने हे वर्ग घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी संबंधित झोनच्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले आहे.