पुणे – पावसाळीपूर्व कामांना “जीएसटी’चा फटका

कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधी मिळत नसल्याने आर्थिक अडचणी


वॉर्डनिहाय पथकातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात


संरक्षण मालमत्ता विभागाकडून बोर्डाला बचतीचे आदेश

पुणे – वस्तू व सेवा करातील (जीएसटी) निधी मिळत नसल्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला आर्थिक चणचण जाणवत असून त्याचा फटका आता लष्कर परिसरातील पावसाळीपूर्व कामांनाही बसला आहे. पावसाळी गटारे आणि नाले तुंबल्यास त्याची तातडीने स्वच्छता करण्यासाठी बोर्डातर्फे नेमण्यात येणाऱ्या वॉर्डनिहाय पथकातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. या पथकातील 20 कर्मचाऱ्यांची संख्या आता पाचवर आली आहे. त्यामुळे यंदा जोरदार पाऊस झाल्यास लष्कर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.

लष्कर परिसरातील पावसाळी वाहिन्या अथवा नाले तुंबून रस्त्यावर पाणी साचल्यास तातडीने स्वच्छता करण्यासाठी बोर्डातर्फे 20 कर्मचाऱ्यांची पथके नेमली जातात. याशिवाय प्रत्येक वॉर्डात पर्यवेक्षक आणि मुकादमांची नियुक्ती केली जाते. या वॉर्डनिहाय पर्यवेक्षक आणि मुकादमांकडे रस्त्यावर पाणी साचल्याची तक्रार आल्यावर पथकाच्या मदतीने तातडीने गटारे-नाल्यातील गाळ काढून रस्ते साफ केले जातात. त्यानुसार, यंदाही बोर्डाने वॉर्डनिहाय पथके नेमली आहेत. मात्र, या पथकांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. जीएसटीचा निधी मिळत नसल्याने संरक्षण मालमत्ता विभागाकडून बोर्डाला बचतीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बोर्डाने या पथकातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली असून उर्वरित कर्मचाऱ्यांना कचरा संकलनाचे काम देण्यात आले असल्याचे बोर्डाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, पूर्वमोसमी पावसात दरवर्षी घोरपडी, महात्मा गांधी रस्ता, कुंभारबावडी, शिवाजी मार्केट परिसरात रस्त्यांवर पाणी साचते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालक, पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. स्थानिक रहिवाशांच्या घरातही पाणी शिरते. त्या पार्श्‍वभूमीवर बोर्डातर्फे या परिसरातील गटारे व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर केली जात असून जिथे जिथे गटारे व नाल्यांमध्ये कचरा साचतो, ती ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत. याशिवाय महात्मा गांधी रस्ता, मोलेदिना रस्ता, इस्ट स्ट्रीटवरील पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता व भैरोबा नाला, माणिक नाला आणि फिलिप नाल्याची सफाई कामे सुरू असल्याचे बोर्डाचे आरोग्य विभाग प्रमुख आर. टी. शेख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)