40 प्रकारातील 3 लाख किलो फुले विक्रीसाठी दाखल
पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजारात अक्षय तृतीयेमुळे मागील दोन दिवसांत 40 हून अधिक प्रकारातील 3 लाख 2 हजार 51 किलो फुले विक्रीसाठी दाखल झाली होती. यामध्ये मोगरा, गुलछडी, चाफा आदी सुवासिक फुलांना मोठी मागणी राहिली.
अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात. या शुभदिवशी मोठ्या प्रमाणात फुलांनी घराची सजावट केली जाते. त्यानिमित्ताने गेल्या दोन दिवसांत पुण्यासह ठाणे, मुंबई तसेच कोकण भागांतील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आवक वाढल्याने बाजारात फुलांचा तुटवडा जाणवला नाही. मागणी वाढली असली तरी त्यातुलनेत आवक वाढल्याने फुलांच्या दरात मोठी वाढ झाली नसल्याचे फुलबाजार अडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष अप्पा गायकवाड यांनी सांगितले.
सणाच्या काळात दोन दिवसांत बाजारात फुलांची मोठी आवक होत असते. यावेळी जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातून मोठी आवक झाली. फुलांना चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून शेतात फुले राखून ठेवली होती.
– प्रदीप काळे, विभागप्रमुख, फुलाबाजार