10 ते 20 टक्क्यांनी भाव घसरले : बदलत्या हवामानाचा बसतोय फटका
पुणे – बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. सध्या पडत असलेल्या जोरदार थंडीमुळे द्राक्षांमध्ये गोडी येण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यातच हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाजारात आणत असून, वेळेच्या आधीच दहा ते बारा दिवस द्राक्ष तोडणी होत आहे. त्यामुळे द्राक्षांच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली असून द्राक्षांना अपेक्षित मागणी नसल्याचे दिसून येत आहे.
मार्केट यार्डातील फळ विभागात जिल्हासह सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक होत आहे.
विशेषत: कृष्णा, जम्बो, शरद सीडलेस, सुपर सोनाका, तास-ए-गणेश, माणिक चमन या वाणांचा आवकमध्ये समावेश आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापुर तालुक्यातून सर्वाधिक द्राक्षे बाजारात दाखल होत आहेत. थंडीमुळे फळांना तडे जातील अथवा अवकाळी पाऊस येईल, या शक्यतेने मोठ्या प्रमाणात द्राक्षे विक्रीसाठी पाठविली आहेत. कमी गोडीची आणि अपरिपक्त द्राक्षे मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असल्याने द्राक्षांच्या दर्जासह भावही कोसळला आहे. दरम्यान, गारठा कायम असल्याने जिल्ह्यासह परराज्यातूनही द्राक्षांना अपेक्षित मागणी होत नाही. यामध्ये, उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश आहे. याबाबत व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “बाजारात दाखल होत असलेली द्राक्षे अपरिपक्व आणि गोडीला कमी आहेत. सध्यस्थितीत जम्बो द्राक्षांना गोडी आहे. येत्या आठवडाभरात थंडी ओसरून उष्णतेत वाढ होण्यास सुरूवात झाल्यानंतर उर्वरित द्राक्षांच्या गोडीमध्ये वाढ होईल. त्यानंतर द्राक्षांना शहरासह परराज्यांमधून मागणी वाढेल.’ तर, आडते असोसिएशनचे सचिव रोहन उरसळ म्हणाले, “16 फेब्रवारीपर्यंत हिच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात पाठवित आहे.’
घाऊक बाजार
द्राक्षे भाव (15 किलो)
तास-ए-गणेश 550 ते 700
सुपर सोनाका 800 ते 1100
शरद 600 ते 800
माणिकचमन 400 ते 550
कृष्णा 700 ते 900
जम्बो (10 किलो) 350 ते 700