पुणे – धान्य पुरवठा वाहनांना ‘जीपीएस’ यंत्रणा

एजन्सी नेमणार : शाळांपर्यंत पोहोचेल सर्व धान्य


पुरवठा करणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण

पुणे – शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील शाळांना धान्यपुरवठा करणाऱ्या वाहनांना “जीपीएस’ यंत्रणा बसविण्यासाठी येत्या आठवड्याभरात एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

धान्यपुरवठ्यात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नुकत्याच धान्यपुरवठ्यासाठी नव्याने पुरवठाधारकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या वाहतुकीच्या वाहनांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी आता पहिल्यांदाच “जीपीएस’ ट्रॅकींग सिस्टीम वाहनांना बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेची सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी एजन्सीकडून ऑनलाइन निविदा मागविण्यात येणार आहेत. याबाबत शासनस्तरावर अनेकदा बैठकांचे सत्रही राबविण्यात आलेले आहे. शासनाने यंत्रणा राबविण्यास मान्यता दिली असून संबंधित विभागाला आदेशही लागू केलेले आहेत.

“जीपीएस’ यंत्रणा बसविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. निविदा दाखल झाल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करून कामाचे अंतिम आदेशही लवकरच लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. “जीपीएस’मुळे धान्य कोणत्या ठिकाणाहून गोदामात आले आणि गोदामातून कोणत्या शाळांना व कधी गेले याची सविस्तर माहितीच आता अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे भरारी पथकांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याचे काम कमी होणार आहे.

मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को. आप. कन्झ्युमर्स फेडरेशनला धान्यपुरवठा करण्यासाठी पुणे, कोल्हापूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वाधिक एकूण 8 जिल्ह्यांचा ठेका मिळाला आहे. श्री कृष्णा असोशिएट्‌सला वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. श्रीहरी राईस अँड ऍग्रो लि.ला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, आशुतोष ट्रेडर्सतर्फे अकोला, खंडेलवाल इंडस्ट्रीजकडून अमरावती, साई ट्रेडिंग कंपनीला बीड, कार्तिकी सप्लायर्सतर्फे औरंगाबाद, गणेश एंटरप्रायझेसकडून धुळे, एम. पी. भूतडाला लातूर, राजेंद्र ट्रेडिंग कंपनीला नांदेड, एनएसीओएफ इंडिया लि.कडून नाशिक, सालासार ट्रेडिंग कंपनीला रायगड, मधुसुदन एजन्सीला सांगली, किरण ट्रेडर्सला सातारा, स्टार एटंरप्रायझेसला ठाणे, जगदंबा एंटरप्राईजेसला वाशिम, गुनीनी कमर्शिअसला जळगाव, मोरेश्वर महिला प्राथमिक ग्राहक सहकारी संस्थेला हिंगोली, जालना याप्रमाणे जिल्हानिहाय पुरवठाधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. यात नवीन कमी व जुन्याच जास्त पुरवठाधारकांचा समावेश असून या सर्वांच्याच वाहनाना “जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)