पुणे – ललित कला, गणवेशधारी सेवा क्षेत्राला पसंती

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कल-अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कल-अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. यात सर्वाधिक 36 टक्‍के विद्यार्थ्यांनी ललित कला व गणवेशधारी सेवा या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. त्यानंतर वाणिज्य क्षेत्राला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे.

दहावीच्या परीक्षेनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी चालू वर्षी राज्यातील 22 हजार 122 शाळांमधील 16 लाख 13 हजार 609 विद्यार्थ्यांची मोबाइलच्या माध्यमातून कल-अभिक्षमता चाचणी घेण्यात आली. कल चाचणी घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये संगणकाच्या माध्यमातून ही कलचाचणी घेण्यात आली.

यंदा कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रांसाठी विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यात आला. यात एकूण विद्यार्थ्यांच्या टक्‍केवारीचा विचार करता सर्वाधिक 18.17 टक्‍के विद्यार्थ्यांनी ललित कला क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यानंतर 17.83 टक्‍के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेला प्रथम प्राधान्य दिले आहे. 16.19 टक्‍के विद्यार्थ्यांनी वाणिज्य, 14.11 टक्‍के विद्यार्थ्यांनी कृषी, 13.41 टक्‍के विद्यार्थ्यांनी कला व मानव्य विद्या, 9.6 टक्‍के विद्यार्थ्यांनी तांत्रिक क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. एकूण 3 लाख 86 हजार 121 विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये कल दर्शविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 9 विभागांपैकी 4 विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि 3 विभागांमध्ये ललित कला क्षेत्राला सगळ्यात जास्त प्राधान्य दिले आहे. वाणिज्य क्षेत्राला दुसऱ्या क्रमाकांचे प्राधान्य दाखविले आहे.

मुलींचा कल विचारात घेता 20.33 टक्‍के मुलींनी ललित कला व 16.73 टक्‍केवाणिज्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. मुलांचा कल पाहता 18.92 टक्‍के मुलांचा कल गणवेशधारी सेवा व 17.73 टक्‍के वाणिज्य क्षेत्रात प्राधान्य दर्शविले आहे.

कल-अभिक्षमता चाचणीचा निकाल शनिवारी दुपारी 11 वाजता पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 22 मार्चपर्यंत छापील अहवाल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्याप्राधिकरण), श्‍यामची आई फाउंडेशन यांच्या वतीने कलचाचणी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

मुलींचा क्षेत्रनिहाय कल टक्‍केवारी
ललित कला – 20.33, गणवेशधारी सेवा – 16.57, कृषी – 14.73, कला व मानव्यविद्या – 14.53, वाणिज्य – 14.39, तांत्रिक – 10.28, आरोग्य व जैविक विज्ञान – 9.17.

मुलांचा क्षेत्रनिहाय कल टक्‍केवारीमध्ये
गणवेशधारी सेवा – 18.92, ललित कला -16.32, कृषी-13.55, वाणिज्य-17.73, कला व मानव्यविद्या – 12.45, आरोग्य व जैविक विज्ञान – 13.01, तांत्रिक 8.02.

चाचणी दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या
पुणे-267627, नागपूर-161965, औरंगाबाद-183254, मुंबई-351866, कोल्हापूर-139527, अमरावती-166768, नाशिक-200520, लातूर-107472, कोकण-34610.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)