पुणे – धनादेश बाऊन्स प्रकरणातून वगळावे

खासदार पूनम महाजन यांचा अर्ज; शुक्रवारी सुनावणी

पुणे – धनादेश बाऊन्सप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून वगळण्यासाठी खासदार आणि भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी अर्ज केला आहे. गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही. माझ्याविरोधात दाखल असलेली तक्रार वैध नसल्याने संबंधित गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असे या अर्जात म्हटले आहे.

त्यावर शुक्रवारी (दि. 15) निर्णय होणार आहे. या प्रकरणात पूनम महाजन यांच्यासह त्यांचे पती वजेंदला रामानंद व्यंकटराव राव, मिलिंद सुर्वे आणि आद्या मोटर प्रा. लि. कंपनी यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. आरोपी संचालक असलेल्या आद्या मोटर कंपनीकडून होंडा सिटी खरेदीच्या प्रकरणात दिलेले धनादेश बाऊन्स प्रकरणात व्यावसायिक परविंदर सिंग यांनी जिल्हा न्यायालयात मार्च 2018 साली तक्रार दाखल केली आहे. सिंग हे असेट ऑटो प्रा. लि. चे मालक असून त्यांचे कार्यालय पुण्यात आहे. सिंग यांना व्यवसायासाठी कार खरेदी करायच्या होत्या. त्यानुसार आद्या मोटरला 11 होंडा सिटी कारची ऑर्डर दिली होती. त्यासाठी 68 लाख 75 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, वेळेत डिलिव्हरी न दिल्याने सिंग यांनी कारची बुकींग रद्द करून रक्‍कम परत मागितली होती. त्यानुसार सिंग यांना 17 लाख 50 हजार रुपये परत करण्यात आले. परंतु उर्वरित रक्‍कम दोन वर्षांपर्यंत परत केली नाही. उर्वरित धनादेश देण्यात आले. मात्र, ते वटले नाहीत. त्यामुळे सिंग यांनी यासंदर्भात धनादेश बाऊन्सची तक्रार दिली होती.

दरम्यान, यापूर्वी देखील आरोपी आणि सिंग यांच्यात काही व्यवहार झाले होते. त्याची रक्‍कम परत करण्यासाठी सिंग यांना देण्यात आलेले धनादेश देखील वटले नव्हते. त्या प्रकरणात देखील कायदेशीर नोटीस बजावत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात एकूण तीन खटले दाखल केले आहेत. तर दोन खटल्यांमध्ये तीनही संचालकांना समन्स पाठविले आहेत. व्यवहार झाले तेव्हा महाजन संचालक होत्या. राजीनामा दिला आहे, म्हणून त्याचा या प्रकरणाची त्यांचा काही संबंध नाही, असे म्हणता येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांचा निर्वाळा युक्‍तिवादा दरम्यान देण्यात आला आहे, अशी माहिती सिंग यांचे वकील ऍड. सिद्धार्थ पाटील यांनी दिली.

प्रकरण दाखल होण्यापूर्वीच महाजन यांनी दिला आहे राजीनामा
न्यायालयाने पहिल्या खटल्यास स्थगिती दिली आहे. महाजन यांनी 2015 साली आद्या मोटरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. हे सर्व प्रकरण 2018 मध्ये घडले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल असलेली तक्रार वैध नाही. त्यानुसार त्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा अर्ज करण्यात आला होता. त्यावर युक्‍तिवाद पूर्ण झाला असून शुक्रवारी प्रकरण निकालासाठी ठेवले आहे, अशी माहिती महाजन यांचे वकील विनय व्यास यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)