पुणे – काही कामे वगळता, अंदाजपत्रक म्हणजे रद्दी पेपर!

विरोधकांची टीका : तर, वास्तववादी “बजेट’चा सत्ताधाऱ्यांचा दावा

पुणे – “हे अंदाजपत्रक नसून भाजपचा जाहीरनामा आहे. तसेच दोन चारकामे सोडली तर हे अंदाजपत्रक म्हणजे रद्दी पेपर आहे,’ अशी टीका अंदाजपत्रकीय भाषणात विरोधकांनी केली; तर “हे अंदाजपत्रक वास्तववादी आहे’ असे कौतुक सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी केले. दरम्यान, या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर महापालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी मांडलेला 6 हजार 765 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“दोन हजार चौ. फुटांपेक्षा जास्त मोठी मैदाने मुलांसाठी असावीत त्यासाठी तरतूद करण्यात यावी, तसेच गदिमा स्मारकासाठी तरतूद केल्याचा आनंद आहे. याशिवाय बालगंधर्व रंगमंदिराची पुन्हा उभारणी करणे आवश्‍यक आहे,’ असे मत माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन समितीच्या कार्याविषयी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. शाळांमधील एकेका शिक्षकाची मराठी भाषा संवर्धन समितीवर नेमणूक करावी, यामुळे मराठी शाळांची पटसंख्या वाढायला मदत होईल,’ असे सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.

“आमच्या काळातील योजनांना नवीन मुलामा देऊन अंदाजपत्रकात आणले आहे. लोकांनी तुम्हांला डोक्‍यावर घ्यावे अशी एकही योजना अंदाजपत्रकातून आणली नसल्याची टीका प्रशांत जगताप यांनी केली. कचरा, कारकस, एसआरए, डुकरांचे कुत्र्याचे प्रकल्प सोलापूर रस्त्यावर आणले त्याबरोबरच चांगल्या योजनाही आम्हांला द्या,’ अशी मागणी जगताप यांनी केली.

मूकबधीरांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध सुभाष जगताप यांनी केला. “या बजेटचा नुसता फुगवटा आहे. दोन-चार कामे सोडली, तर हा नुसता रद्दी पेपर आहे. ठेकेदार, अधिकारी आणि सदस्य मिळून पालिकेवर दरोडा घालत आहेत. या अंदाजपत्रकात सामान्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. जमेच्या बाजूचा तर शिमगाच आहे. असा विश्‍वासघात करू नका,’ अशी खरमरीत टीका जगताप यांनी केली.

“घोषवाक्‍यांच्या माध्यमातून कचरा स्वच्छता जागृती चांगली आहे. ती पुढे तशीच सुरू ठेवावी,’ असे महेश वाबळे म्हणाले. तर, “जुना मुळा-मुठा कालव्यावर पूल बांधण्याविषयी तरतूद करण्यात आली नाही. तात्पुरती मलमपट्टी न करता ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. दिवे घाटात नेहमीच बसेस बंद पडतात. कायम याकडे दुर्लक्ष केले जाते. जुन्या बसेस असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. हडपसरला नव्या बसेस द्याव्यात,’ अशी मागणी वैशाली बनकर यांनी केली.

शहरी एकात्मिक सायकल योजना राबवण्याचा विचार केला आहे. सायकल ट्रॅक वर अतिक्रमणे आहेत ते काढण्याऐवजी नवे सायकल ट्रॅक बनवताय. फुटपाथवर अतिक्रमणे झाली आहेत. फूटपाथ पथारीवाल्यांचे हक्काचे व्यासपीठ झाले आहेत. ते काढण्यासाठी पूर्णवेळ भरारी पथक हवेत. डुकरांसाठी अंदाजपत्रकात तरतूद दिसत नाही. अंदाजपत्रकात तरतूद करताना पश्‍चिम भागावर जास्त फोकस केला आहे. कुत्र्यांचा, कारकस असले प्रकल्प आमच्याकडे लादता मग “स्मार्ट’चे प्रोजेक्‍ट ही आमच्याकडे द्या ना. मुंढवा जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्ध होते की नाही हे पाहिले पाहिजे, असेही बनकर यांनी नमूद केले.

“ऐतिहासिक वास्तूंसाठी तरतूद हवी होती. सांताक्‍लॉज बनून तुम्ही आम्हाला तरतूद द्या स्थायी समिती अध्यक्षांना सांगणे आहे,’ असे पल्लवी जावळे म्हणाल्या. “पाण्यासाठी आंदोलने केली. वडगावशेरीत पाणी नाही. आम्ही खूप आंदोलने केली आहेत. वाहतूक कोंडी चा प्रश्‍न भेडसावत असतो. अध्यक्षांनी नगरस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे फायदा झाला आहे. समतोल बजेट केले आहे,’ असे सुनीता गलांडे म्हणाल्या.

“पंतप्रधानांनी एकच ठोसा दिला आहे. लालबहादूर शास्त्रीनंतर मोदी हे एकच झाले की ज्यांनी हे कर्तृत्त्व करून दाखवले आहे. मूकबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु त्याला जबाबदार धरून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातो मात्र सर्जिकल स्ट्राईकबाबत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करण्याएवढा मोठेपणा दाखवत नाही,’ अशी टीका धीरज घाटे यांनी केली.

विरोधकांच्या टीकांचे आम्ही स्वागत करतो. परंतु शहराचा विकास नजरेसमोर ठेवूनच हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. शहराचा भौगोलिक विस्तार, वाहतूक, आरोग्य, पर्यावरण या बाबींचा विचार करून शहराच्या शाश्वत विकासाची धोरणे तसेच शहाराची ओळख कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला असून, सर्वांना सोबत घेऊन या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी केली जाईल.
– योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती.


2017 मध्ये भाजपने जाहीरनामा केला. त्यात रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्याने शहराचे नाव लौकिक वाढला आहे. काम करताना शहराचा विकास हाच उद्देश आहे. हीच बाब लक्षात घेऊन योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात आला असून भविष्यात शहरासाठी हे अंदाजपत्रक दिशादर्शक ठरणारे आहे.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते.


अंदाजपत्रजत समान तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या मतदार संघात सर्व निधी नेला असून हा समान विकास कसा होऊ शकतो. एका बाजूला अंदाजपत्रक फुगविले जात असताना, दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचे स्रोत सुचविण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात घेता अंदाजपत्रक केवळ फुगवटा आहे.
– वसंत मोरे, गटनेते, मनसे.


अंदाजपत्रक 1 हजार कोटींनी फुगविण्यात आले आहे. त्याच वेळी कायद्यात कर्जरोखे त्याच कामासाठी वापराने आवश्‍यक असताना हा निधी भांडवली कामासाठी देऊन कायद्यालाच हरताळ फसण्यात आला आहे. उत्पन्न आणि खर्चाची तरतूद करताना कोणत्याही ताळमेळ नाही. कल्याणकारी योजनांचा निधी कमी करण्यात आला आहे.
– अरविंद शिंदे, कॉंग्रेस गटनेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)