पुणे – पर्यावरणीय समस्या राजकीय अजेंड्यावर याव्यात

शहरात विविध प्रश्‍न : पर्यायवरणप्रेमी नागरिकांच्या अपेक्षा

पुणे – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. पुण्यातही मंगळवारी मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विविध पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्‍वासन दिले जात आहे. मात्र, निवडून आल्यानंतर हे लोकप्रतिनिधींनी पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कामे करावीत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्‍त होत आहे.

हवा-पाण्याचे प्रदूषण, नदीची दुर्दशा, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांवर होणाऱ्या बांधकांमांमुळे जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, मानव-वन्यप्राणी संघर्ष अशा अनेक समस्यांनी शहराला घेरले आहे. निवडणुकीचे औचित्य साधत राजकीय पक्षांनी आगामी काळातील आपल्या कामाबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पर्यावरणीय समस्यांवर भाष्य करत त्यासाठी उपाययोजना करण्याचेही आश्‍वासन दिले आहे. भारतीय जनता पक्षाकडून वृक्षारोपण, बांबू लागवड यांसारख्या उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे, तर कॉंग्रेस पक्षाकडून पर्यावरणपूरक शहरनिर्मितीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात हे प्रश्‍न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

तर गेल्या पाच वर्षांत प्रदूषणासंदर्भात उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी मोजके पदाधिकारी वगळता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात कोणीही फिरकले नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पर्यावरणविषयी जागरूकता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

गेल्या काही वर्षांत शहराचे विस्तारीकरण प्रचंड प्रमाणात झाले. इमारती वाढू लागल्या, वृक्षतोड झाली. प्रक्रियाविरहित सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नदीची दुर्दशा झाली. नदीसुधारणा प्रकल्पाबाबत काहीच काम झालेले नाही, असे चित्र आहे. याऊलट प्रकल्प अधिकारी “थोड्याच’ दिवसात काम सुरू होईल, असे म्हणत चालढकल करत आहेत.
– मनीष घोरपडे, पर्यावरणप्रेमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)