पुणे – वीज दरवाढीचा झटका; ऐन उन्हाळ्यात महावितरणचा निर्णय

पुणे – उन्हाचा कडाका वाढत असतानाच राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना महागाईचा “झटका’ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या आदेशानुसार ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. दि.1 एप्रिलपासून राज्यातील वीज दरात सरासरी सहा टक्के दरवाढ लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्थिर आकारामध्येही 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे वीज ग्राहकांना मेमध्ये येणारे वीजबिल या वाढीव दराने येणार आहे.

अदानी आणि टाटा पॉवर या खाजगी कंपन्यांनीही त्यांच्या वीजेच्या दरात वाढ केली आहे, त्यामुळे वीजदरात वाढ करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव महावितरण प्रशासनाने राज्य वीज नियामक आयोगाला दिला होता. यावर आयोगाने प्रशासन, वीज ग्राहक आणि वीज ग्राहक संघटनांची सुनावणी घेतली होती. त्यानुसार आयोगाने 8 हजार 268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, या दरवाढीमुळे वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा बसू नये यासाठी ही दरवाढ टप्प्याटप्प्याने करण्यात यावी, असे आदेश राज्य वीज नियामक आयोगाला दिले होते. त्यानुसार येत्या पाच वर्षांपर्यंत ही दरवाढ टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले, “आयोगाच्या आदेशानुसार ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्राहकांना जादा भुर्दंड सहन करावा लागणार नाही, याची दक्षता या नव्या दरवाढीत घेण्यात आली आहे.’

असे असतील नवे वीजदर
दर महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना जुन्या दरानुसार प्रतियुनिट 5 रुपये 30 पैसे मोजावे लागत आहेत नव्या दरानुसार या ग्राहकांना प्रती युनिट 5 रुपये 46 पैसे मोजावे लागणार आहेत. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट 24 पैसे जादा तसेच 300 ते 500 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट 15 पैसे जादा मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय व्यवसायिक वीज ग्राहकांना त्या त्या वर्गवारीनुसार आणि क्षमतेनुसार जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)