पुणे – 1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक

तीन टक्‍के वाढ : नागरिकांचे बजेट कोलमडणार

पुणे – राज्य वीज नियमन आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार 1 एप्रिलपासून दरवाढ लागू होत असून त्याचेप्रमाण तीन टक्‍के असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

निवासी ग्राहकांच्या प्रति युनिट वीजदरवाढीचे प्रमाण पाहिल्यास ते तीन टक्‍क्‍यांपर्यंतच राहाते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर 12 हजार 382 कोटी रुपयांची तुर्तास लांबणीवर टाकलेली दरवाढ ही विधानसभा निवडणुकीनंतर होणार नाही तर ती आयोगाच्या आदेशानुसार एप्रिल 2020 पासून लागू होईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
आयोगाने मंजूर केलेल्या वीज दर आदेशातील 8 हजार 268 कोटी वाढ ही आर्थिक वर्षे 2018-19 व 2019-20 साठी मंजूर करून देण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2018 -19 साठी रु. 6.63 प्रति युनिट एवढा सरासरी वीज दर मंजूर केला होता; तर आर्थिक वर्ष 19-20 साठी 6.85 रुपये प्रति युनिट एवढा सरासरी वीजदर मंजूर केला आहे. त्यानुसार एकूण सरासरी वीजदर वाढ ही साधारण 3 टक्‍के एवढीच आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 साठी 500 युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या वीजदरात आर्थिक वर्ष 18-19 च्या तुलनेत सरासरी केवळ 3 टक्‍के एवढीच वाढ झालेली आहे. घरगुती ग्राहकांच्या स्थिर आकारात केवळ 10 रुपये प्रति महिना एवढीच वाढ असून सरासरी वीजदरात 17 ते 31 पैसे प्रति युनिट म्हणजेच केवळ 3 टक्‍के एवढीच वाढ आहे. आयोगाने दि. 12 सप्टेंबर 2018 च्या वीजदर आदेशानुसार घरगुती ग्राहकांसाठी मंजूर केलेल्या दरवाढीनुसार ही वाढ केली आहे, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)