पुणे – मैलापाणी शुद्धीकरणासाठी आठ निविदा

जायकांतर्गत होणार : सर्व निविदा कंपनीकडे पाठवण्यात येणार


शहरात होणार 20 मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प


113 किमीच्या मैलापाणी वाहिन्या टाकणार


मुठा नदीचे पाणी शुद्धीकरण करून नदीत सोडणार

पुणे – नदी सुधार प्रकल्पांतर्गत (जायका) भैरोबा नाला आणि नायडू रुग्णालय परिसर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी महापालिका प्रशासनाकडे आठ निविदा आल्या आहेत. हे प्रकल्प जायका प्रकल्पांतर्गत करण्यात येणार असल्याने त्या जपानमध्ये जायका कंपनीकडे पाठविण्यात येणार आहेत.

नदी सुधार प्रकल्पांतर्गत शहरात विविध ठिकाणी 20 मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि 113 किमी लांबीच्या मैलापाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत सर्वप्रथम नदीच्या कडेने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारून मुठा नदीचे पाणी शुद्धीकरण करून नदीत सोडले जाणार आहे.

-Ads-

या प्रकल्पांतर्गत भैरोबा नाला येथील जुना मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प पाडून त्या ठिकाणी नव्याने 74 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिका प्रशासनाकडे एकूण तीन निविदा आल्या आहेत; तर नायडू रुग्णालय येथील जुना प्रकल्पांच्या ठिकाणी नव्याने 127 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पाच निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्या निविदा जायका कंपनीच्या सल्लागाराकडे पाठवण्यात येणार आहेत. निविदांची छाननी करून पात्र निविदा सल्लागारामार्फत जायकाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

60 कोटी मिळाले
या प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीने अर्थसहाय्य देऊ केले आहे. त्यासाठी ते नऊशे कोटी रुपये कर्जस्वरुपात देणार आहेत. त्याचे व्याज केंद्र सरकार भरणार असून, ही रक्‍कम महापालिकेला अनुदान स्वरुपात नदी सुधार योजनेसाठी मिळणार आहे. त्यातील सुमारे 60 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मतदारांवर प्रभाव पाडणारे निर्णय घेता येत नाहीत. मात्र, या निविदा आचारसंहितेच्या नियमांच्या कक्षेत येत नाहीत. या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या निविदा असल्याने याला आचारसंहितेचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे या निविदा उघडण्यात येणार आहेत.
– व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)