शहरातील दोन मार्गांवर संचलन
पुणे – पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी शहरात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेस मंगळवारपासून (दि.12) शहरात धावणार आहेत. सुरूवातीला हडपसर ते हिंजवडी व भेकराईनगर ते शिवाजीनगरदरम्यान बसेस धावणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे प्रथमच पुणेकरांना वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसमधून प्रवास करता येणार आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी ई-बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार टप्याटप्याने भाडेतत्वावर 500 ई-बस खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरात दाखल झालेल्या 25 बसेसचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते झाले. या ई – बसेस दोन्ही महापालिका हद्दीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी पुणे शहरातील 4 तर पिंपरी चिंचवडमधील 3 मार्ग निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सर्व 25 बसेसची नोंदणी आरटीओ प्रशासनाकडे झाली नसल्याने सुरूवातीला 10 बसेस धावणार आहेत. यासाठी पुण्यातील 2, तर पिंपरीतील निगडी ते भोसरी आणि निगडी ते हिंजवडी हे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासूनच या मार्गावर बस धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
निगडी, भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन
इलेक्ट्रीक बसेससाठी पुणे शहरातील भेकराईनगर तर पिंपरी चिंचवडमधील निगडी डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनची सोय करण्यात आली आहे.