पुणे – उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना ड्युटी

शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्याचे शिक्षण विभागाकडून प्रयत्न

पुणे – दरवर्षी घटत चाललेली महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीचा उपयोग करून घेतला गेला आहे. या सुट्टीत “पटनोंदणी आपल्या दारी’ अभियान राबविले जात आहे.

यासोबतच सुट्ट्यांमध्येही शिक्षक शाळांमध्ये दोन तास वेळ देत असून मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत असून या प्रयोगातून नेमके किती प्रवेश झाले याचा आकडा शाळा सुरू झाल्यावर समजू शकेल, असे शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.

या अभियानासाठी महापालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना मुख्य जबाबदारी देण्यात आलेली असून, त्यांना सहायक मदतनीस देण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या शाळांची पटसंख्या घटू लागली आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून सेमी इंग्रजी, संगीत विद्यालय, मॉडेल स्कूलसह ई-लर्निंग सुविधा अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षण विभागाकडून 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत हे अभियान रबाविण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर 10 जून ते 30 जून या कालावधीदरम्यान हे अभियान पुन्हा राबविले जाणार आहे.

यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. यासोबतच बालवाडीतील मुलांच्या पालकांच्या बैठका घेण्यात येत असून शाळेच्या माहितीचे सादरीकरण, पालकांशी वारंवार संपर्क ठेवणे असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या शाळांना सुट्या आहेत. परंतु आळीपाळीने शिक्षक दररोज दोन तास या शाळांसाठी देत आहे. यावेळेत शाळेत येणाऱ्या पालकांशी संवाद साधण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)