पुणे – मार्केटयार्डात डमी आडत्यांचा उच्छाद

पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद : बाजार समिती कारवाई करणार का?


शेतकऱ्यांच्या मालाला मिळतोय कमी भाव

पुणे – मार्केट यार्डातील फळ आणि तरकारी विभागात पुन्हा डमी आडल्यांची संख्या वाढत चालली आहे. एका गाळ्यावर दोन डमी ठेवण्यास बाजार समितीने परवानगी दिली आहे. तरीही एका गाळ्यावर 4 ते 8 डमी आडत्यांची संख्या असल्याचे दिसून येत आहे. डमींमुळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळत असून, आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती डमी आडत्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, आडत्यांची संघटना असलेल्या आडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावरच जास्त प्रमाणात डमी दिसून येत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेने फुल, फळे, तरकारी विभागात मुख्य आडते, त्याच्या गाळ्यावर दोन डमी आडत्यांना “मदतनीस’ या गोंडस नावाखाली परवानगी दिली आहे. बाजार समितीने गेल्यावर्षी बाजारातील वाहतुक कोंडी सोडविण्याबोरबर शिस्तीसाठी बाजारातील नविन नियमावली केली होती. त्यानुसार बाजाराच्या वेळा, डमी आडत्यांची संख्या आदी नियम घालून दिले. त्यानुसार काही काळ या नियमांची अंमलबजावणीसह कारवाईही झाली. मात्र, काही दिवसांपासून डमी आडत्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. आडते असोसिएशनच्या झालेल्या एका सर्वसाधारण सभेतही दोनच डमी आडते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावरच डमींची संख्या वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आडते बनतायेत मालामाल
डमी आडत्यांना गाळ्याच्या मूळ मालकाला म्हणजे आडत्याला दिवसाला सुमारे 500 ते 1000 रुपये इतके भाडे द्यावे लागते. त्या बदल्यात त्यांना गाळ्यासमोर शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. एका गाळ्यावर 4 ते 10 आडत्यांची संख्या आहे. त्यामुळे मुळ गाळेधारक आडत्यांला वर्षाला काही न करता दीडे ते 6 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. यात शेतकरी पिचला जात असल्याची परिस्थिती आहे. तर, बाजार समितीला यातून कोणतेही शुल्क अथवा कर मिळत नाही.

शेतकऱ्यांचे नुकसान आणि वाहतूक कोंडी
डमी आडते गाळ्याच्या समोर शेतमाल विक्री करण्यास बसतात. गाळ्यासमोर पंधरा फुटांपर्यंतच शेतमाल विक्रीस परवानगी असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे बाजारात शेतमालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास होतो. परिणामी, वाहतुककोंडी निर्माण होते. तर, डमी आडते गाळेधारक आडतदाराकडून शेतमाल घेऊन त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यात शेतकऱ्याच्या शेतमालास प्रत्यक्षात कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आडतेच फायद्यात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)