अवयवदानात पुणे विभाग अव्वल

“ब्रेनडेड’ व्यक्‍तीमुळे 6 ते 7 जणांना जीवदान

पुणे – डॉक्‍टर आणि सामाजिक संस्थांकडून “ब्रेनडेड’ व्यक्तीच्या नातेवाईकांचे समुपदेशनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे, राज्यात अवयवदान जनजागृती चळवळ जोर धरत आहे. त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. यावर्षी प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीचा पुणे विभाग हा अवयवदानात अव्वल ठरला आहे. यंदाच्या वर्षात पुण्यात गेल्या नऊ महिन्यात सुमारे 51 “ब्रेनडेड’ दात्यांनी अवयव दान केले आहे. दुसऱ्या क्रमाकांवर मुंबई, तिसऱ्या क्रमांकावर नागपूर, तर चौथ्या क्रमांकावर औरंगाबाद असल्याची माहिती समोर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अवयवदान हे सर्वांत मोठे दान असून एका “ब्रेनडेड’ व्यक्ती सहा ते सात जणांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे अवयवदान चळवळ वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात जानेवारी ते सप्टेंबर 2018 या काळात 51 जणांनी अवयवदान केले. तर, त्या पाठोपाठ मुंबई प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अखत्यारीतील भागांमध्ये 40 दाते आढळले असून त्यांनी अवयवांचे दान केले आहे.

नागपूर विभागात 10, तर औरंगाबाद विभागात 6 ब्रेनडेड दाते आढळले आहेत. गेल्या वर्षी पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीने सप्टेंबरअखेर 41 जणांचे अवयवदान केले होते. यंदाच्या वर्षी त्यात वाढ झाली, अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या पुणे विभागाच्या (झेडटीसीसी) सूत्रांनी दिली आहे.

पुणे विभागाच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितले, “पुण्यात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत 51 जणांनी अवयवदान केले आहे. त्यामध्ये 9 पेशंटने संमती देऊनही वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या अवयवांचे दान करता येऊ शकले नाही.’

सर्वाधिक अवयवदान हे मूत्रपिंडाचे झाले. 65 मूत्रपिंडाचे दान करण्यात आले असले, तरी त्यापैकी 59 मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले. 9 जणांना हृदयदान करण्यात आले असून, त्यापैकी पुण्यात 7 तर अन्य पुण्याबाहेरील रुग्णांना देण्यात आले. 47 जणांना यकृत दिले. दोघांचे फुफ्फुस मिळाले असून, ते चेन्नई आणि मुंबईतील रुग्णांना दान करण्यात आले. सहा जणांनी त्वचा दान केली. 72 डोळे तर पाच जणांना स्वादुपिंडासह मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. दोन जणांच्या हातांचेही दान करण्यात आले आहे.
– आरती गोखले, समन्वयक, प्रादेशिक प्रत्यारोपण समिती, पुणे विभाग

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)