पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत 64 हजार 417 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अर्जांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 27 मे पासून संकेतस्थळावर संधी उपलब्ध करून दिली आहे. शाळा व मार्गदर्शन केंद्रामार्फत माहिती पुस्तिकांचे वाटपही केले आहे. माहिती पुस्तिकांचा अभ्यास करून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरूच आहे.
पुणे विभागासाठी सुमारे
1 लाख प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी दरवर्षी 75 हजारापर्यंत अर्ज दाखल होऊन प्रवेश होतात. यावर्षी अर्ज दाखल होण्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दाखल अर्जांपैकी 25 हजार 320 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 22 हजार 182 अर्जांची स्वयंचलित प्रणालीद्वारे पडताळणी पूर्ण झाली आहे. 16 हजार 915 अर्जांची अद्याप पडताळणी पूर्ण झालेली नाही, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली. राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासाठी सर्वाधिक 1 लाख 25 हजार 613 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 27 हजार 51 अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. 68 हजार 547 अर्जांची संगणक प्रणालीद्वारे तपासणी पूर्ण झाली आहे. 30 हजार 15 अर्जांची तपासणी बाकी आहे. नाशिक विभागात 19 हजार 580 अर्ज दाखल असून यातील 11 हजार 912 अर्जांची पडताळणी झाली आहे. 2 हजार 783 अर्जांची आपोआप तपासणी झाली आहे. 4 हजार 885 अर्जांच्या तपासणीचे काम सुरू आहे.
नागपूर विभागात 17 हजार 734 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 10 हजार 175 अर्जांची पडताळणी झाली आहे. 1 हजार 765 अर्जांची पडताळणी व्हायची राहिली आहे. 5 हजार 794 अर्जांची तपासणी होणे बाकी आहे. अमरावती विभागात 2 हजार 160 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 1 हजार 17 अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. 278 अर्जांची आपोआप तपासणी झाली आहे. 865 अर्जांची तपासणी झालेली नाही. औरंगाबाद विभागात 5 हजार 652 अर्ज भरण्यात आले आहेत. यामधील 1 हजार 951 अर्जांची पडताळणी झाली आहे. 2 हजार 135 अर्जांची संगणकाद्वारे आपोआप तपासणी झाली आहे. 1 हजार 566 अर्जांची तपासणी होणे बाकी आहे.
चार दिवसांत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणार
दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवारी (दि.8) जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकाबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. दरम्यान, अर्जाचा भाग-2 भरणे, अर्जांची तपासणी करणे, प्रवेश फेऱ्यांची यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत यांच्या तपशिलाचा समावेश असलेले प्रवेशाचे वेळापत्रक येत्या चार दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.