पुणे जिल्हा फुटबॉल संघटना साखळी स्पर्धा 2018-19 : परशुरामियन्स् संघाला उपविजेतेपद
पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) तर्फे आयोजित साखळी 2018-19 स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटामध्ये बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप संघाने विजेतेपद तर, परशुरामियन्स् संघाने उपविजेतेपद मिळवले. एफसी पुणे सिटी संघाने 14 आणि 16 वर्षाखालील गटाचे विजेतेपद संपादन करताना दुहेरी मुकूट पटकावला.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) ढोबरवाडी येथील मैदानावर हे सामने झाले. अव्वल श्रेणी गटाच्या सामन्यात बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप (बीईजी) आणि परशुरामियन्स् फुटबॉल क्लब यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. बीईजीकडून प्रेम नंदा आणि एस. लोखंडे तर, परशुरामियन्स् फुटबॉल क्लबकडून गुलाम अन्सारी याने दोन गोल केले.
स्पर्धेत बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप (बीईजी) आणि परशुरामियन्स् फुटबॉल क्लब या दोन्ही संघांनी 12 विजय, 1 बरोबरी आणि विनापराभव सामन्यांमध्ये एकूण 37 गुणांची कमाई केली. बीईजी संघाने 42 गोल मारले होते व केवळ 4 गोल संघावर होऊ दिले. परशुरामियन्स् फुटबॉल क्लबने 44 गोल केले पण 10 गोल होऊ दिले. या गोल फरकामुळे बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप (बीईजी) संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. परशुरामियन्स् फुटबॉल क्लब उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात एफसी पुणे सिटी संघाने केशव माधव प्रतिष्ठान संघाचा टायब्रेकमध्ये 5-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. सामन्यामध्ये गोलशुन्य बरोबरी राहील्याने सामन्यात टायब्रेकपध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये एफसी पुणे सिटीकडून उस्मान खान, अर्ष बागवान, फहाद शेख, हर्षवर्धन धुमाळ, भार्गव सावंत यांनी गोल केले. केशव माधव प्रतिष्ठान संघाकडून गौरव मोरे, स्टॅलिन हिरेकरी, सुमित पतंगे, हर्षवर्धन मिया यांनी गोल केले. एफसी पुणे सिटी संघाने लायन पीसीएच संघाचा टायब्रेकमध्ये 4-3 असा पराभव करून 16 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले.