पुणे : इस्त्रोच्या डेहराडून येथील भारतीय सुदूर संवेदन संस्थेचा शिरूर येथील सी.टी.बोरा महाविद्यालयाबरोबर करार झाला असून त्या अंतर्गत कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना घरी बसून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
बदलत्या माहिती तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांत रोजगार निर्माण झाले आहेत . परंतु, या क्षेत्रांत काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात केल्याशिवाय रोजगार मिळत नाही. त्यासाठी सी. टी. बोरा महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने इस्त्रोबरोबर करार करून ऑनलाईन मार्गदर्शन करणारे सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना सुध्दा ऑनलाईन पध्दतीने नावीन्यपूर्ण अभ्यासक शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांना इस्त्रोमध्ये चालणा-या सुदूर संवेदन आणि जीआयएस या अभ्यासक्रमासाठी सुमारे 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून भूगोल विभागातील प्रा.डॉ.अतुल जेठे यांची आयआयआरएसतर्फे नितुक्ती करण्यात आली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घरी बसून कौशल्य विकसित करता येणार असून रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे हा अभ्यासक्रम विद्यार्थी व प्राध्यापकांना संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.येत्या 25 एप्रिलपर्यंत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमास 75 टक्के उपस्थित असणारा विद्यार्थी परीक्षा देण्यास व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाण पत्रास पात्र असेल, असेही डॉ. मोहिते म्हणाले.