जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती
नायगाव- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुरंदर तालुक्यातील 7 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच ही कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून मार्गी लावण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा जलसंधारण व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
शिवतारे म्हणाले की, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात राज्यात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मिळाला आहे. मागील चार वर्षांत जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचे रस्ते मार्गी लागले आहेत. अर्थसंकल्प, नाबार्ड, विशेष दुरुस्ती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, लेखाशीर्ष 2515 अंतर्गत ग्रामविकास निधी आणि जिल्हा वार्षिक योजना या माध्यमातून पुरंदर हवेली तालुक्यातील रस्ते विकसित होत आहेत. लवकरच आणखी एक रस्त्यासाठी निधी मिळणार असून त्यात जवळपास 22 रस्ते विकसित होत आहेत.
आंबळे येथील रामवाडी ढवळेश्वर मंदिर रस्त्यासाठी 3 कोटी 61 लाख, पिंपळे शिवरी सटवाई दातेमळा रस्त्यासाठी 3 कोटी 29 लाख, वीर येथील बनकर गोठा रस्त्यासाठी 1 कोटी 94 लाख, नायगाव येथील शेंडगेवस्ती रस्त्यासाठी 1 कोटी 53 लाख, भिवडी ते क्षीरसागरवस्ती रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाख, खेड शिवापूर रस्ता ते मठवाडी दुरकरवाडी (गराडे) रस्त्यासाठी 2 कोटी 28 लाख, सासवड रोड ते जाधववाडी (दिवे) रस्त्यासाठी 1 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा