हप्ता दिला नाही म्हणून सहा दुकानांवर दगडफेक

वडकी, उरुळी देवाची हद्दीतील घटना : सात जणावर खंडणीचा गुन्हा

लोणी काळभोर- परप्रांतीय दुकानदारांनी प्रतिमहा हप्ता म्हणून मागीतलेली रक्कम दिली नाही या कारणांवरून चिडून जावून 5 ते 6 जणांनी 6 दुकानांवर दगडफेक करून काचेच्या बाटल्या फेकल्या असल्याची घटना वडकी व उरूळी देवाची गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी सात जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दिलीप मोडक व त्याच्या 5 ते 6 साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भागीरथ रमेशकुमार जांगीड (वय 29, सध्या रा. वडकी, ता हवेली. मुळ रा. हिंगोला, ता. मारवाड जंक्‍शन, जि. पाली, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील म्हणाले की, भागीरथ जांगीड यांचे वडकी गावच्या हद्दीत किराणा मालाचे दुकान आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी ते दुकानात असताना दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या दुकानात गणेश मोडक आला. त्यावेळी त्याने दुकान चालवायचे असेल तर मला हप्ता म्हणून प्रतिमहा 5 हजार रुपये द्यायचे. नाही दिले तर दुकान बंद करून टाकीन, अशी धमकी दिली होती. त्यावेळी भागीरथ यांनी रक्कम देण्यास नकार दिला होता. म्हणून चिडून जावून मोडक हा शिवीगाळ दमदाटी करून निघून गेला होता. त्यानंतरही त्याने वारंवार पैशांची मागणी केली होती. तर बुधवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास भागीरथ हे आपली आई मिश्रिबाई यांच्यासमवेत दुकानात असताना 2 दुचाकी वरून 5 जण आले. त्यावेळी सर्वांच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. त्यांनी अचानक दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली व गणेश मोडकने सांगितले असतानाही हप्ता दिला नाही तर असेच होणार असे म्हणून ते सर्वजण निघून गेले.
या प्रकाराची तक्रार देण्यासाठी भागीरथ उरूळी देवाची दूरक्षेत्र येथे गेले असता तेथे त्यांचे ओळखीचे दुकानदार चुनाराम मानारामजी चौधरी, पोखाराम पुनारामजी चौधरी, अईधनराम पुराराम चौधरी, महेंद्रसिंग मोहनलाल राठोड व कैलाश गंगाराम चौधरी हे भेटले व त्यांनाही मोडकने पैशांची मागणी केली होती. ते देण्यास नकार दिला म्हणून त्यांच्या दुकानावरही अनोळखी 5 ते 6 व्यक्‍तींनी दुचाकीवर येवून दगडफेक करून काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. शिवीगाळ दमदाटी करून महिन्याचे महिन्याला हप्ता द्यायचा, असे म्हणून निघून गेले. या सर्वांच्या वतीने भागीरथ जांगीड यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)