न्हावरे (प्रतिनिधी) : न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचे उत्पादन घेतले असून, प्रत्यक्ष विक्रीलाही सुरुवात झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी दिली.
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीमधून उत्पादित होणाऱ्या अतिशुध्द मद्यार्कापासून सॅनिटायझर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.यासंदर्भात बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार म्हणाले की, करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रसरकारच्या निर्देशानूसार राज्य सरकारने काही साखर साखर कारखान्यांंना तातडीने सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्याचे परवाने मंजूर केले आहेत.
दरम्यान घोडगंगा साखर कारखान्यास सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा परवाना मिळाला असून, कारखान्याच्या संचालक मंडळाने सरकारच्या अवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत कारखान्याच्या डिस्टिलरीमधून उत्पादित होणाऱ्या अतिशुध्द मद्यार्कापासून सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यामातून सामाजिक बांधिलकी म्हणून करोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला चांगली मदत होणार आहे.
करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत.करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. मात्र, अचानक कोसळलेल्या संकटामुळे सॅनिटायझरची मागणी वाढून बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.त्यातच सॅनिटायझरचा बाजारातील मागणीचा फायदा घेऊन अनेकांनी सॅनिटायझरचा काळाबाजार केल्याचेही उघड झाले आहे.
दरम्यान साखर कारखान्यातून तयार झालेले सॅनिटायझर बाजारात आल्यास त्याचा नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे इतर ठिकाणी तयार होणाऱ्या सॅनिटायझरपेक्षा तुलनेने स्वस्त व शंभर टक्के शुध्द असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.त्याचप्रमाणे कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात त्या-त्या शेतकी गट ऑफिसमध्ये सॅनिटायझरचे वितरण सुरू आहे.